कोरोना प्रादुर्भावाचे संकट लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात रोषणाई व मिरवणुकीला फाटा देताना शहरातील मुस्लिम बांधवांनी यंदा फक्त आपापल्या घरांवर परचम (पवित्र ध्वज) फडकावून यंदाचा “ईद मिलाद उन नबी” साधेपणाने साजरा केला.
कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करून यावेळी शहरात साधेपणाने ईद मिलाद उन नबी साजरी करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे प्रार्थनास्थळे आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोषणाई न करता मुस्लिम बांधवांनी फक्त आपली घरे आणि दुकानांमध्ये रोषणाई करून घरांवर परचम फडकविला होता. त्याप्रमाणे घराघरांमध्ये मिठाईचे वाटप करून ईद मिलाद उन नबी साजरी करण्यात आला.
दरवर्षी ईद मिलाद उन नबी निमित्त शहरात मिरवणूक काढण्यात येत होती. मात्र यावेळी मिरवणुकी ऐवजी फोर्ट रोड येथील जिना चौक येथे मुस्लिम समाजातील मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत ईद मिलाद उन नबीचा परचम फडकविण्यात आला.
याप्रसंगी हाफिज उल्ला साहब यांनी पवित्र कुराण पठण करून नात शरीफ यांचा नजराणा सादर केला. मुक्ती मंजूर मिस्बाही यांनी मिलाद उन नबीचे महत्त्व विशद केले. या पद्धतीने बेळगांवात पहिल्यांदाच इतक्या साध्या पद्धतीने ईद मिलाद उन नबी साजरा करण्यात आला.
जीना चौकातील कार्यक्रमाप्रसंगी मोहम्मद रसूल पिरजादे, अकबर बागवान, अताऊल्ला देसाई, मुक्तार शेख कटगिरी, हजरत अजीम पटवेगार, सलीम मुल्ला, सलाउद्दीन तोरगल, मोईन दफेदार आदी उपस्थित होते.