अगरबत्ती तयार करणाऱ्या कारखान्याला शॉर्टसर्किटने आग लागून सुमारे 4 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना रविवार रात्री शाहूनगर -बी. के. कंग्राळी येथे घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, शाहूनगर -बी. के. कंग्राळी येथील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या अगरबत्ती तयार करण्याच्या कारखान्याला काल रविवारी रात्री 12 च्या सुमारास शॉर्टसर्किटने अचानक आग लागली. आग लागली त्यावेळी एक कामगार कारखान्यात झोपला होता.
बंद घर वजा कारखान्यात लागलेली आग व धूर झपाट्याने सर्वत्र पसरल्यामुळे तो कामगार त्यात अडकून पडला होता. त्याच्या आरडाओरडीमुळे आसपासच्या लोकांना आगीची कल्पना आली आणि त्यांनी लागलीच अग्निशामक दलाला या घटनेची माहिती दिली.
तेंव्हा अग्निशामक दलाच्या जवानांनी फायर स्टेशन ऑफिसर व्ही. एस. टक्केकर यांच्या नेतृत्वाखाली तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन प्रचंड धुराला तोंड देत सुमारे 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.
तत्पूर्वी अग्निशामक दलाच्या जवानांनी आत अडकलेल्या कामगाराला सुखरूप बाहेर काढले. सदर आग विझवण्यासाठी अधिकारी टक्केकर यांच्या नेतृत्वाखाली सी. डी. माने, के. एल. पाटील, के. एम. जिनबसप्पनावर, वालीकर, रसूल काकतकर या अग्निशामक दलाच्या जवानांनी विशेष परिश्रम घेतले.