सीमाभागात एक नोव्हेंबर काळा दिन म्हणून पाळला जातो. 1956 साली कर्नाटक राज्याची स्थापना करताना अन्यायाने बेळगाव सीमाभाग म्हैसूर राज्यात डाम्बण्यात आला. तेव्हापासून आजतागायत सीमाभागातील नागरिक एक नोव्हेंबर काळा दिन म्हणून गांभीर्याने पाळतात. आता यापुढेही संपूर्ण शिवसैनिकांनी एक नोव्हेंबर काळा दिन गांभीर्याने पाळावा असे आवाहन सीमा भागाचे समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकीसह मराठीभाषिक बहुल भाग कर्नाटक राज्यात अन्यायकारक पद्धतीने लावण्यात आला आहे. गेल्या 65 वर्षापासून बेळगावसह सीमा भागातील जनता या अन्यायाविरोधात सातत्याने लढताहेत. बेळगाव सह मराठीभाषिक 865 गावे महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी हा लढा सातत्याने सुरू आहे. या लढ्यासाठी अनेक हुतात्म्यांनी हौतात्म्य पत्करले आहे. तर अजूनही त्याच तीव्रतेने हा लढा देण्यात येत आहे.
एकीकडे कोरोनाच्या संकटात अनेक कार्यक्रम रद्द होत असताना बेळगावात मात्र राज्य उत्सवाला परवानगी देऊन मराठी जनतेवर अन्याय करण्याचा प्रकार आहे. अहिंसा आणि लोकशाही मार्गाने मागील पाच वर्षापासून सीमा भागातील नागरिक हा लढा देत आहेत. मूक सायकल फेरी काढून कर्नाटकाला प्रतिउत्तर देण्यात येते. या वर्षी मात्र कोरोनामुळे निर्बंध पडले आहेत. मात्र पोलिसांनी कानडीकरण करण्याचे कोणतेही ही संधी सोडली नाही.
त्यामुळे एकच संताप होत आहे. तेव्हा संपूर्ण सीमाभाग आणि महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी हाताला काळ्या फिती आणि काळे ध्वज दाखवून निषेध नोंदवावा असे आवाहन सीमा भागाचे समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
दरम्यान या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शिवसैनिकांची भूमिका महत्त्वाची आहे. या लढ्यात प्रमुख भूमिका लक्षात घेता एक नोव्हेंबर रोजी सर्व शिवसैनिकांनी काळी फीत परिधान करून सीमाभागातील मराठी बांधवांना आपला जाहीर पाठिंबा द्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.