आज बेळगावमध्ये आलेले केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेस वर निशाणा साधत काँग्रेस पक्ष म्हणजे कमिशन एजंट असल्याचा आरोप केला होता. या आरोपाला केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी प्रत्त्युत्तर दिले असून भाजप हा सौदेबाजी करणारा पक्ष असल्याचे म्हटले आहे. सातत्याने भाजप आणि काँग्रेसमध्ये होत असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी दिवसेंदिवस वाढत चालल्या असून भाजप नेते आणि काँग्रेस नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध चांगलेच रंगात आहे.
केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी प्रल्हाद जोशींच्या वक्तव्याला उत्तर देताना म्हटले कि, राजकारणात कोणीही राजा सत्य हरिश्चंद्र नाही. देशातील वस्तुस्थिती प्रल्हाद जोशी यांना चांगलीच माहिती आहे. आघाडीवर असणाऱ्या सरकारची परिस्थिती काय आहे हे कुणीही सांगायची गरज नाही. आपण कोणावर आरोप करत आहोत, याची शहानिशा करूनच बोलावे, प्रसारमाध्यमांसमोर प्रसिद्धीसाठी वाट्टेल ते कोणीही बोलू नये, अशा शब्दात जारकीहोळींनी प्रल्हाद जोशी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
भाजपकडून जे जे आरोप केले जातात त्या प्रत्येक आरोपाला उत्तर देण्यासाठी आम्ही बांधील नसून भाजपचे नेते तोंडाला येईल ते बरळतात अशा शब्दात त्यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. भाजप सध्या काय करत आहे हे सर्वांना माहित आहे. भाजप सरकार कंत्राटदार, अधिकाऱ्यांशी कोणत्या प्रकारे सौदेबाजी करून भ्रष्टाचार करत आहे, हे जगजाहीर आहे.
राजकारणात आल्यानंतर डी. के. शिवकुमारांनी किती संपत्ती जमा केली? असा प्रश्न प्रल्हाद जोशींनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, कि भाजपने स्वतःच्या अखत्यारीतील एजन्सीज हेतुपुरस्सर हे कारवाई करायला लावली आहे. भाजपमधील नेत्यांकडे कोणतीही बेकायदेशीर संपत्ती नाही का? काँग्रेसच्या नेत्यांना जाणूनबुजून टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोप जारकीहोळींनी केला असून कायदा सर्वांसाठी समान लावला जावा, शिवाय विनाकारण कोणावरही वाट्टेल ते आरोप करू नयेत, असा सल्लाही त्यांनी दिला.