कोरोनाच्या संकटामुळे सरकारी अटी -नियमांचे पालन करून जत्तीमठ येथील यंदाचा दसरा महोत्सव दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात साजरा न करता साधेपणाने साजरा केला जाणार आहे. तसेच वाळूपासून बनविलेली श्री रेणुका देवीची मूर्ती यंदाचे मुख्य आकर्षण असणार आहे, अशी माहिती शहरातील जत्तीमठ देवस्थानाचे सरपंच दत्ता जाधव यांनी दिली.
दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर आज शनिवारी “बेळगांव लाईव्ह”शी बोलताना दत्ता जाधव पुढे म्हणाले की, गेल्या दहा वर्षांपासून जत्तीमठ येथे दसरा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यावेळी कोरोनाचे संकट कोसळले असल्यामुळे सरकारने घालून दिलेल्या सोशल डिस्टंसिंग, सॅनिटायझर, मास्क आदी अटी -नियमांचे पालन करून साधेपणाने दसरा महोत्सव साजरा केला जाणार आहे. त्याअनुषंगाने यावर्षी अष्टमीचा प्रसाद फक्त मानकऱ्यांना दिला जाईल. कोरोनामुळे गर्दी करण्यास मनाई असल्याने या प्रसादाचे सार्वजनिक वाटप केले जाणार नाही.
विशेष म्हणजे दसरा व नवरात्रोत्सवानिमित्त जत्तीमठामध्ये यंदा वाळूपासून श्री रेणुका देवीची मूर्ती साकारण्यात आली आहे. तानाजी गल्ली येथील वसंत पाटील, विश्वनाथ शिंदे व परशराम पाटील या मूर्तिकारांनी सुमारे महिनाभर परिश्रम घेऊन ही आकर्षक मूर्ती साकारली आहे. श्री रेणुका देवीची ही मूर्ती बनविण्यासाठी जवळपास 1ब्रास वाळूचा उपयोग करण्यात आला असल्याचे जाधव यांनी सांगितले.
जत्तीमठ हे श्री दुर्गामातेचे मंदिर आहे. हे मंदिर प्राचीन असून या मंदिरातील देवी नवसाला पावणारी देवी म्हणून सुपरिचित आहे.
गोव्याकडे कूच करताना खुद्द छत्रपती संभाजी महाराज या ठिकाणी वास्तव्यास होते. पूर्वी जतीमठामध्ये भाविकांची फारशी ये -जा नव्हती. परंतु जेंव्हा देवस्थानाचा विकास करून या ठिकाणी सुधारणा करण्यात आल्या तेंव्हापासून भाविकांची संख्या वाढू लागली. जत्तीमठ देवस्थानाचा विकास साधण्यासाठी विश्वस्त मदन बामणे, मालोजी अष्टेकर, ॲड. अनिल सांबरेकर आणि माजी आमदार कै. संभाजी पाटील यांच्यासह समस्त बेळगाववासियांचे सहकार्य लाभल्याचेही दत्ता जाधव यांनी स्पष्ट केले
बेळगांव शहरातील प्राचीन मंदिरांपैकी म्हणजेच शेकडो वर्षे जुने मंदिर म्हणजे किर्लोस्कर रोड येथील जत्तीमठ श्री दुर्गादेवी मंदिर होय. उत्तर भारतातून दर बारा वर्षातून एकदा येणाऱ्या नाथ पंथीय साधूंच्या झुंडीचे वास्तव्य या मंदिरात असते. बारा वर्षांनी एकदा होणाऱ्या कुंभ मेळ्यास जाण्यापुर्वी देशातील नाथ पंथीय साधू किर्लोस्कर रोडवरील या मंदिराला भेट देतात आणि येथील देवीचं दर्शन घेऊनच कुंभ मेळ्यास जातात. नाथ पंथीयांचं वास्तव्य इथे होत असल्याने हे शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळेच या दुर्गा माता मंदिराला वेगळं विशेष महत्व आहे.
या मंदिरात सतत 24 तास धुनी पेटत ठेवली जाते. दररोज सायंकाळी नगारा वाजवला जातो. मंदिरातील आत असलेल्या देवीचे तोंड पश्चिमेकडे म्हणजेच सुर्यास्त होतो त्या दिशेकडे आहे हे देखील वैशिष्ट्य आहे. मंदिरासमोरील विहिरीचे पाणी कधीच आटत नाही. पूर्वीच्या काळात शहरात दुष्काळ असतेवेळी याच विहिरीतून शहराला पाणी पुरवठा होत होता अशीही माहिती उपलब्ध आहे. परिणामी या विहिरीच्या पाण्याला देखील विशेष महत्व आहे.
मराठा समाजाचे आराध्य दैवत जत्तीमठात साकारण्यात आली आहे रेतीपासून बनविलेल्या रेणुका देवीची मूर्ती-दसऱ्याचे आकर्षण-कश्या पद्धतीनं असणार आहे जत्तीमठात दसरोत्सव काय सांगतात जत्ती मठ कृती समिती अध्यक्ष दत्ता जाधव पहा खालील व्हीडिओ फक्त बेळगाव live वर
#belgaumdassera2020
#belgaum jattimathtemple
#live belgaum
https://www.facebook.com/livebelgaum/videos/991125651395126/