शतक एकविसावे असो किंवा बारावे अजूनही जनता अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर पडली नाही. विज्ञान ज्या गतीने पुढे जात आहे त्याचगतीने अंधश्रद्धाही आगेकूच करत आहे. गेल्या पंधरवड्यात बंगळूरच्या एका संगीतकाराच्या कुटुंबाच्याबाबतीतही अशीच एक गोष्ट घडली होती.
बंगळूरच्या के. कल्याण या संगीतकाराचे कुटुंबही अशाच अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकून एका मांत्रिकाच्या तंत्र मंत्राला बळी पडले. मंत्र-तंत्राचा गोषवारा करून देव आपल्या मुखातून बोलतो असे सांगून संगीतकाराच्या कुटुंबाकडून तब्बल सहा कोटींच्या किंमती वस्तू गडप केल्या आहेत.
के. कल्याण यांच्या घरी घरकाम करणाऱ्या महिलेसोबत डाव रचून या कुटुंबातील सदस्यांना मंत्राच्या मोहात अडकावू पाहणारा शिवानंद वाली हा मांत्रिक अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. आणि त्याच्याकडून हि माहिती उघड करण्यात आली आहे.
मागील पंधरवड्यात आपल्या पत्नीचे तसेच सासू-सासऱ्यांचे अपहरण झाल्याची तक्रार के. कल्याण यांनी नोंदविली होती. बेळगामधील माळमारुती पोलीस स्थानकात हि तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाचा पोलिसांनी तपास घेत शिवानंद वाली आणि के. कल्याण यांच्या घरी घरकाम करणाऱ्या महिलेला अटक केली होती.
६ दिवस पोलीस कोठडीत असणाऱ्या शिवानंद वाली या भोंदू मांत्रिकाने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्याच्याकडून ९ मॅक्सीकॅब्स, ३५० ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, ६ किलो चांदी जप्त केली आहे. तसेच मंत्रांच्या जाळ्यात अडकवून के. कल्याण यांच्या नावे असणारी मालमत्ताही आपल्या नावावर करण्यात आली असल्याचे त्याने कबुल केले आहे, अशी माहिती डीसीपी विक्रम आमटे यांनी दिली आहे.