स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगांव स्मार्ट सिटी लिमिटेडकडून होत असलेली निकृष्ट दर्जाची विकासकामे रामतीर्थनगर व ऑटोनगर येथील संतप्त नागरिकांनी बंद पाडल्याची घटना शुक्रवारी घडली.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरातील रामतीर्थनगर आणि ऑटोनगर येथे सुरू असलेली विकास कामे अत्यंत खराब स्थितीत आहेत. येथील रस्ते व गटारीचे बांधकाम तसेच वीज जोडणी अत्यंत अवैज्ञानिक पद्धतीने केली जात आहे.
विकास कामांसाठी वापरण्यात येणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे असून जनतेसाठी रस्ता खुला होण्यापूर्वीच त्याची फरसबंदी ढासळू लागली आहे. गटारांमध्ये असलेले पथदीपांचे खांब अद्याप हटविण्यात आलेले नाहीत. विकास कामासाठी स्थानिक रहिवाशांच्या घरासमोरील भागाचे नुकसान करण्यात आले आहे, त्याची अद्याप दुरूस्ती करण्यात आलेली नाही. बहुतांश ठिकाणच्या सिमेंट बांधकामास तडे गेले आहेत.
विकास कामांमधील या त्रुटी शुक्रवारी रामतीर्थनगर व ऑटोनगर येथील संतप्त नागरिकांनी संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून तर दिल्याच शिवाय सुरू असलेली विकास कामे बंद पाडली. परिणामी कालपासून रामतीर्थनगर आणि ऑटोनगर येथील स्मार्ट सिटीची कामे ठप्प झाली आहेत.