पंचमसाली लिंगायत समाजाला २ अ प्रवर्गामध्ये समाविष्ट करून आरक्षणाच्या मागणीसाठी आज कुडल संगम येथील बसव मृत्युंजय जगद्गुरू यांच्या उपस्थितीत सुवर्ण विधान सौध समोर एकदिवसीय उपोषण करून आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनाद्वारे राज्य आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधून पंचमसाली लिंगायत समाजाला आरक्षण मिळवून देण्याची मागणी करण्यात येत आहे.
लिंगायत धर्मातील पंचमसाली समाजात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे. बहुतेक लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. या समाजातील नागरिकांना सरकारी सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे या समाजाला २ अ प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी मागणी करण्यात आली.
यावेळी गुरुवारी सकाळी राणी चन्नम्मा सर्कल जवळ कुडलसंगमचे बसव जयमृत्युंजय स्वामींनी चन्नम्मांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला चालना दिली.
यावेळी डॉ. बी. आर. आंबेडकर, संगोळी रायन्ना, आणि हिरेबागेवाडी येथील विश्वगुरू बसवण्णा यांच्या पुतळ्यालाही अभिवादन करण्यात आले. तिथून पुढे सुवर्णसौध येथे आंदोलन करून उपोषण सत्याग्रहाला सुरुवात करण्यात आली.
या आंदोलनात माजी सचिव पी. सी. सिद्दनगौडर, माजी खासदार मंजुनाथ कोण्णूर, पंचमसाली युवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजशेखर मेणसिनकायी, जि. पं. सदस्या रोहिणी पाटील यांच्यासह पंचमसाली समाजाचे लोकप्रतिनिधी, मान्यवर आणि हजारो नागरिक सहभागी झाले होते. हे उपोषण सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.