हिरेबागेवाडी येथे उभारण्यात येत असलेल्या नव्या विद्यापीठाच्या जागेत बहुग्राम पेयजल योजना कार्यान्वित होणार होती. परंतु याठिकाणी विद्यापीठासाठी जागा मंजूर करण्यात आल्यामुळे हे पेयजल प्रकल्प रद्द होण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु हिरेबागेवाडी येथे जमीन पाहणी साठी आलेले उपमुख्यमंत्री अश्वथ नारायण यांनी हा पेयजल प्रकल्प रद्द होणार नसून इतर पर्यायी ठिकाणी हा पेयजल प्रकल्प सुरु करण्याचे आश्वासन दिले.
ही जमीन विद्यापीठासाठी देण्यामागे कोणताही राजकीय स्वार्थ नसून विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे. शिवाय बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्यासह प्रत्येक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करून ही जमीन मंजूर करून घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थ्यांना सर्व सोयी-सुविधा मिळण्यासाठी हा निर्णानी घेण्यात आला असून याच धर्तीवर कित्तूरमध्येही आवश्यक विकास कामे हाती घेण्यात आली आहेत.
या भागातील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी आणि कर्नाटकातील या विद्यापीठात प्रत्येक प्रकारचा अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. येथील मल्लयज्ज्न देवस्थानाच्या विकासासाठीही सरकारकडून अतिरिक्त जमीन मंजूर करून घेतली जाईल, असा विश्वास त्यांनी ग्रामस्थांना दिला.
यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रामचंद्रगौडा, कुलसचिव प्रा. बसवराज पद्मशाली, प्रा. एस. एम. हुरकडली, विद्यापीठाचे सिंडिकेट सदस्य डॉ. आनंद होसूर, एच. एस. शिग्लाव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.