गुरुवारी (दि. १) शास्त्रीनगर भागात आढळलेल्या अजगराच्या शोध अजूनही सुरूच आहे. शास्त्रीनगर नववा क्रॉस येथील एका गटारीत पाण्याची उबळ येत आहे. या गटारीच्या मार्फ़त एक अजगर साप यातून बाहेर येत असतानाच व्हिडीओ व्हायरल झाला होता. या अजगराला पकडण्यासाठी गेले ४ दिवस प्रयत्न सुरु असून अजूनही त्याचा शोध लागलेला नाही.
अजूनही अनेक ठिकाणी पावसाचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे दाट रान वाढते. शेतीमध्येही संपूर्ण शिवार हिरवेगार होते. अशा वातावरणात साप बाहेर पडतात. आणि जमिनीवर बेसावधपणे पाय पडला तर सर्पदंशाची दाट शक्यता असते. पूर्वी शेत शिवारात सर्पदंश आणि सर्पदर्शनाच्या घटना घडत होत्या. अशा घटना जुलै ते सप्टेंबर महिन्यापर्यंत मोठ्या प्रमाणात घडतात. परंतु ऑकटोबर महिना येऊनही अजूनही पाऊस थांबलेला नाही. त्यामुळे गेल्या तीन महिन्यात अनेक ठिकाणी सापाचे दर्शन घडले आहे.
शास्त्रीनगर नववा क्रॉस (दैवद्नय शाळेच्या मागील बाजूला) येथील भागात एका गटारीत जवळपास १२ ते १५ फुटी अजगराचे दर्शन झाले होते. गटारीमार्फत बाहेर पडणारा हा अजगर अचानक गायब झाला. यादरम्यान या भागातील रहिवाशांनी सर्पमित्र गणेश दड्डीकर याना बोलाविले. मागील ४ दिवसांपासून हा अजगर साप शोधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या भागापासून १०० ते २०० मीटर अंतरावर असलेल्या बळ्ळारी नाल्याच्या पाण्यातून हा अजगर साप आल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या भागात झाडे – झुडुपे मोठ्या प्रमाणात वाढली असून या झुडुपातून हा अजगर गेला असावा अशी प्राथमिक शक्यता वर्तविण्यात येत होती. ही झाडेझुडुपे काढण्यासाठी जेसीबीची गरज होती. त्यामुळे पालिका आयुक्त के. जगदीश यांना विनंती करून या ठिकाणी असलेल्या गटारीतील पाणी काढण्यासाठी तसेच या भागाची स्वच्छता करण्यासाठी जेसीबी पुरविण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार रविवारी सकाळी ७.३० च्या दरम्यान पालिकेच्यावतीने जेसीबी आणि वॉटर सकिंग मशीन पाठवून देण्यात आली. याच्या साहाय्याने सकाळी ७.३० वाजल्यापासून या भागातील युवावर्ग आणि नागरिकांनी पाणी उपसण्याचे काम केले. याव्यतिरिक्त स्थानिकांनी २ एचपी मोटर लावूनही याठिकाणचे पाणी काढण्यास मदत केली. परंतु अजूनही या अजगर सापाचा शोध लागला नाही. या भागात दलदल झाली असून याचठिकाणी हा साप असल्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.
या भागाच्या आजूबाजूच्या परिसरात एका दिशेला गुड्सशेड रोड, एका दिशेला हुलबत्ते कॉलनी आहे. त्यामुळे शास्त्रीनगर, गुड्सशेड रोड, हुलबत्ते कॉलनी आणि आजूबाजूच्या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, लहान मुलांना या सापाचा शोध लागेपर्यंत बाहेर पाठवू नये, असे आवाहन सर्पमित्र गणेश दड्डीकर यांनी केले आहे.
या शोध मोहिमेत गणेश दड्डीकर या सर्पमित्रासह, स्थानिक नागरिक तसेच सुधीर किल्लेकर, सुनील गोडसे, सागर उचगावकर, विशाल मुरकुटे, विनायक हवालानाचे, संतोष साळवी, सुधीर साळवी, गुरु अणवेकर, विनायक बिर्जे, महांतेश कोमार, शिवराज कोमार यांनी सहभाग घेतला.