बेळगांव – खानापूर मार्गावरील पिरनवाडी मच्छे झाडशहापूर गावानजीकच्या रस्त्याची पार दुर्दशा झाली असून त्याची तात्काळ डागडुजी केली जावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
झाडशहापूर गावापासूनच्या रस्त्याची सध्या संपूर्ण दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावरून दररोज शेकडो लोक ये-जा करत असतात. या सर्वांसाठी हा रस्ता त्रासदायक ठरत आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहने नादुरुस्त होण्याचे प्रकार सातत्याने घडतात आहेत.
त्याचप्रमाणे दुचाकी वाहन चालकांसाठी तर हा रस्ता विशेष करून रात्रीच्या वेळी धोकादायक बनला आहे. त्यांना रस्त्यावरून दुचाकी घेऊन जाताना जीव मुठीत धरून कसरत करत जावे लागत आहे.
या रस्त्याची किमान डागडुजी तरी तात्काळ होणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या रस्त्याला कोणी वाली आहे की नाही? असा संतप्त सवालही केला जात आहेत. तरी लोकप्रतिनिधींनी आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरेने हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.