कर्नाटकात म्हैसूर नंतर बेळगावमध्ये मोठ्या प्रमाणात दसरोत्सव साजरा केला जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा खबरदारीसाठी अनेक उत्सवांवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे यंदा २५ ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या दसरोत्सवावरही प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. परंतु परंपरेनुसार आणि कोरोनाची पार्श्वभूमी पाहता सरकारच्या मार्गसूचीनुसार हा सण साजरा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागण्यात आली होती.
यासंबंधी बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी पाठपुरावा करून जिल्हाधिकारी आणि धर्मादाय विभागाशी चर्चा केली असून चर्चेअंती प्रशासनाने हा उत्सव साजरा करण्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे, अशी माहिती आमदार अनिल बेनके यांनी आज दिली.
बेळगावमधील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या ज्योती महाविद्यालयाच्या मैदानावर प्रत्येक वर्षी सीमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडतो. परंतु गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाची खबरदारी म्हणून यंदा येथे येणाऱ्या सासनकाठ्या, पालख्या आणि साजरा करण्यात येणाऱ्या सीमोल्लंघनाला प्रशासनाने परवानगी नाकारली होती. यादरम्यान शहर देवस्थान समितीची बैठक पार पडली. आणि या बैठकीत हा उत्सव कोणत्याही परिस्थिती प्रशासनाच्या मार्गसूचीनुसार साजरा करण्याचे ठरविण्यात आले. त्यानंतर आमदार अनिल बेनके यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन आणि धर्मादाय समितीशी चर्चा करून या सिमोल्लंघनासाठी विविध नियमांसह प्रशासनाने परवानगी दिली आहे.
या मार्गसूचीत प्रशासनाने असे म्हटले आहे कि, या उत्सवादरम्यान निघणाऱ्या मिरवणुकीत 10 हुन अधिक लोक सहभागी नसावेत, त्याचप्रमाणे सामाजिक अंतर आणि मास्कचा वापर अनिवार्य असेल, याव्यतिरिक्त केंद्र आणि राज्य शासनाच्या कोविड मार्गसूची अंतर्गत सर्व नियम आणि अटी पाळूनच कॅम्पसह इतर देवस्थान समित्यांनी पालखी – मिरवणूक काढावी.
प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर/समितीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शिवाय ज्या देवस्थान समित्यांना / दसरोत्सव समित्यांना मिरवणूक काढावयाची असल्यास संबंधित परिसराच्या पोलीस विभागाची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे मार्गसूचीत नमूद करण्यात आले आहे.
कोरोना परिस्थिती अजूनही आवाक्यात आली नसून जनतेने स्वतःचे आरोग्य सांभाळून दसरोत्सवात सहभागी होताना नियमांचे पालन करावे, उत्सवासाठी कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये, आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आमदार अनिल बेनके यांनी केले आहे.