दरवर्षीप्रमाणे येत्या एक नोव्हेंबर काळा दिनी शहरात सायकल फेरी काढण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली असून अशा आशयाचे निवेदन आज शुक्रवारी सादर करण्यात आले.
1 नोव्हेंबर काळा दिनी दरवर्षीप्रमाणे यंदादेखील शहरात सायकल फेरी काढण्यास परवानगी द्यावी या मागणीचे निवेदन आज शुक्रवारी शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्तांना सादर करण्यात आले. निवेदनाचा स्वीकार करून आपण योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले. याप्रसंगी समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर आदी उपस्थित होते. कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न केंद्र सरकारने सीमाभागातील मराठी जनतेवर अन्याय केला आहे.
त्याच्या निषेधार्थ गेल्या 1956 पासून महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे 1 नोव्हेंबर रोजी हरताळ पाळून सायकल फेरी काढण्यात येते. यंदादेखील ही सायकल फेरी काढण्यास परवानगी देण्यात यावी. त्याच प्रमाणे सायकल फेरी दरम्यान घोषणा देण्यासाठी लाऊड स्पीकर वापरण्याची परवानगी दिली जावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असून निवेदनात सायकल फेरीचा मार्ग देखील नमूद करण्यात आला आहे.
सायकल फेरीचा मार्ग पुढील प्रमाणे असेल.
संभाजी उद्यान येथून 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता सायकल फेरीला प्रारंभ, त्यानंतर तानाजी गल्ली, रेल्वे गेट, भांदुर्गे गल्ली, हेमू कलानी चौक, स्टेशन रोड, शिवाजी रोड, रामलिंग खिंड (कुलकर्णी गल्ली कॉर्नर), हेमू कलानी चौक, तहसीलदार गल्ली (फुलबाग गल्ली कॉर्नर), फुलबाग गल्ली, शनिमंदिर, रेल्वे ओव्हर ब्रिज, कपिलेश्वर मंदिर, एसपीएम रोड, शिवाजी गार्डन, पोलिस कॉटर्स, बसवान गल्ली (होसूर कॉर्नर), नार्वेकर गल्ली, शहापूर बालाजी मंदिर, आचार्य गल्ली, गाडे मार्ग, सराफ गल्ली, काकेरू चौक, बसवान गल्ली, गणेशपुर गल्ली, काकेरू चौक, जेड गल्ली, डाक बंगला, कोरे गल्ली, कचेरी गल्ली, मिरापुर गल्ली, खडेबाजार, बँक ऑफ महाराष्ट्र, महात्मा फुले रोड मार्गे गोवा वेस सर्कल येथे सांगता.