कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीसाठी नवरात्री आणि दसऱ्याला निर्बंध घातले होते. यामुळे बेळगाव शहर देवस्थान समिती आणि कॅम्प येथील विविध दसरोत्सव समित्यांच्यावतीने परंपरेप्रमाणे दसरोत्सव साजरा करण्यासाठी अनुमती मागण्यात आली होती. या मागण्यांचा विचार करून सरकारने दसरोत्सव साजरा करण्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे. या परवानगीचा आदेश आज जिल्हाधिकारी कार्यालय, हिंदू धार्मिक आणि धर्मादाय विभागाच्यावतीने जारी करण्यात आला आहे.
१७ ते २५ ऑक्टोबर या दरम्यान साजरा होणाऱ्या नवरात्र आणि दसरा उत्सवासाठी केंद्र आणि राज्यशासनाच्या कोविड नियमावली, मार्गसूची आणि आदेशानुसार हा सण साजरा करण्यात यावा, अशा सूचना जारी केलेल्या परिपत्रकात देण्यात आल्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने ‘५.० अनलॉक’ मार्गसूची जारी केली आहे. त्यानुसार संपूर्ण देशातील कोविड परिस्थिती पाहता खबरदारी म्हणून मंदिर आणि देवस्थानात होणारी गर्दी टाळण्यासाठी धर्मादाय विभागाने काही नियम जाहीर केले आहेत. मंदिरात भक्तांना प्रवेश देताना कोविडच्या नियमांचे पालन करण्यासहीत ठराविक वेळ ठरवून देण्यात आली आहे. याप्रमाणेच सण, उत्सव, यात्रा, जत्रा, रथोत्सव आणि मिरवणुकीही रद्द करण्यात आल्या आहेत.
काही ठिकाणी पारंपरिक उत्सव हे साधेपणात साजरे करण्याची अनुमती देण्यात आली आहे. परंतु सार्वजनिक रित्या कोणत्याही उत्सवाला प्रशासनाने परवानगी दिली नसून कोविड पार्श्वभूमीवर संसर्गाची शक्यता असल्याने गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. कोणतेही सण, उत्सव, जत्रा, यात्रा मिरवणूक सध्याच्या परिस्थिती मोठ्या प्रमाणात साजरे करणे योग्य नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
प्रशासनाच्या आदेशानुसार दसरोत्सव साजरा करण्यासाठी कोविड संदर्भातील मार्गसूचीचे पालन करून दसरोत्सव आचरणात आणण्यासह सार्वजनिक ठिकाणी सासन काठ्या, पालखी, मिरवणूक न काढता देवस्थानाच्या आवारात, किंवा आतल्या आत हा सण साजरा करणे, ठराविक भक्त, पुजारी आणि देवस्थानांच्या प्रमुखांसह कमीतकमी लोकांमध्ये दसऱ्यादिवशी पालखी काढणे, साधेपणात हा सण साजरा करणे, अशा अटी परिपत्रकात नमूद करण्यात आल्या आहेत.
बेळगाव शहरातील बेळगाव शहर देवस्थान समिती, देवदादा सासन काठी समिती, चव्हाट गल्ली देवस्थान समिती, त्यासोबतच कॅम्प परिसरातील दसरोत्सव साजरा करणाऱ्या समित्यांना दसरोत्सव साजरा करून प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी परिपत्रक जारी केले आहे. प्रशासनाने ठरवून दिलेल्या मार्गसूचीचे, आदेशाचे उल्लंघन केल्यास राष्ट्रीय आपत्ती निवारण कायद्यांतर्गत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी ‘बेळगाव लाईव्ह’शी बोलताना बेळगाव उत्तर चे आमदार अनिल बेनके म्हणाले, सालाबादप्रमाणे बेळगावमध्ये दसरा उत्सव साजरा करण्यात येत आहे. परंतु कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रत्येक सणावर मोठ्या प्रमाणात आचरण करण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. परंतु बेळगावमधील समस्त देवस्थान कमिटीच्या मागणीचा विचार करून प्रशासनाने दसरोत्सव साजरा करण्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे. या मार्गसूचीनुसार दसरोत्सवाचे आचरण करावे. एखाद्या मंडळाला मिरवणूक काढायची असल्यास त्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करून परवानगी घ्यावी. शिवाय कांगली गल्ली आणि कॅम्प परिसरात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या नवरात्रोत्सवालाही सशर्त परवानगी देण्यात आली आहे.