मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे बेळगावच्या पाटील मळा येथील घरांची पडझड झाली होती. या घरांच्या पुनर्बांधणीसाठी सरकारने नुकसान भरपाई जाहीर केली होती. परंतु आजतागायत या नुकसानग्रस्तांना भरपाई मिळाली नसल्याने अनेक कुटुंबांना बेघर होण्याची वेळ आली आहे. याठिकाणी अनेक मंत्र्यांनी तसेच अनेक लोकप्रतिनिधींनी भेट देऊन भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते.
पाटील मळा येथील जवळपास १२ घरांचे नुकसान झाले होते. एक वर्ष उलटले परंतु तरीही नुकसानभरपाई मिळत नसल्याने सरकारच्या भरवशावर न राहता स्वतः नागरिकांनी घर उभारणी सुरु केली आहे.
मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे बेळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्याला मोठा फटका बसला होता. अनेक ठिकाणी इमारतीत पाणी साचले होते. तर संपूर्ण शहरातील सखल भागात पाणी साचले होते. शहरातील पाटील मळा येथील अनेक घरे कोसळली. यासहित शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यादरम्यान सरकारने अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते.
परंतु नुकसानग्रस्तनच्या पदरी निराशाच पडली असून सरकारी आश्वासनाव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची भरपाई येथील नुकसानग्रस्तांना मिळाली नाही. यावेळी संपूर्णपणे जमीनदोस्त झालेल्या घरांसाठी ५ लाख रुपये नुकसान भरपाईचे आश्वासन देण्यात आले होते. तोपर्यंत इतर ठिकाणी सोय करावी, आणि त्यासाठी घरभाडे देण्याचीही तयारी सरकारने दर्शविली होती. नुकसान भरपाईसाठी नुकसानग्रस्तांनी निवेदनही सादर केले होते. परंतु नेहमीप्रमाणेच आश्वासनांचे गाजर दाखवून सरकारी कामाची दशा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे.
दिलेल्या आश्वासनांची दखल अधिकारी वर्गाने घेतली नसून, निराशेने हे नुकसानग्रस्त नागरिक स्वतःची घरे स्वतःच उभारण्यासाठी तयार झाले आहेत. आज पडझड झालेल्या घरांच्या मातीचा ढिगारा जेसीबीच्या साहाय्याने हटवून कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. या पडझड झालेल्या घरांची पुनर्बांधणी येथील नागरिक कर्जाऊ रक्कम घेऊन करत असून येत्या काळात सरकारी मदतीची अपेक्षा हे नुकसानग्रस्त नागरिक करत आहेत.