कोरोनामुळे आधीच सर्वसामान्यांच्या खिशाला झळ सोसावी लागत असून दैनंदिन आयुष्यातील गरजांसाठी कष्ट सोसावे लागत आहेत. रोजच्या आहारातील अन्नपदार्थांचे दर दिवसेंदिवस वाढत असून कांद्याच्या दराने शंभरी गाठली आहे.
राज्यासह संपूर्ण देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. तर दुसऱ्या बाजूला पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक पिके ओलिताखाली आली आहेत. पीक नुकसान झाल्यामुळे बाजारातील आवक मंदावली असून अन्नपदार्थांचे दर गगनाला भिडले आहेत. येत्या काही दिवसात कांद्याचा दर १५० रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कांदा पीक घेण्यात येणाऱ्या भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे देशातील सर्वात मोठ्या प्रमाणात कांदा पिकवणाऱ्या महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे, यामुळे कांद्याच्या दरात भरमसाट वाढ झाली आहे. तर कांद्याला पर्याय म्हणून अनेक ठिकाणी कोबीचा वापर करण्यात येत आहे. परंतु भाजीपाल्याचे दरही वाढले असून विक्री मंदावल्याने
विक्रेते तसेच दर वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे.
येत्या कालावधीत सणासुदीचे दिवस आहेत. विजया दशमी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे तर लवकरच दिवाळी सणही जवळ येत आहे. या सणासुदीच्या काळात अत्यावश्यक वस्तू आणि अन्नधान्याची मागणी वाढते. परंतु आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांसह मंदावलेल्या बाजारपेठेमुळे विक्रेते अडचणीत येण्याची शक्यता आहे.