सतत पडणाऱ्या पावसाने अन्य पिकांबरोबरच कांद्याचे नुकसान केल्यामुळे कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. बेळगांव एपीएमसी मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक झाली नसल्यामुळे कांद्याचे दर अचानक वाढले आहेत.
गेल्या कांही दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे मार्केट यार्डातील कांद्याचा साठा मोठ्या प्रमाणात कुजून गेला आहे. बागलकोट, हावेरी, गदगसह बेळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून बेळगाव एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याची आवक होते. मात्र यावेळी पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे एपीएमसी येथे कांदाच आलेला नाही. परिणामी गोदामात साठा केलेल्या कांद्याचा दर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
सध्या बेळगांव एपीएमसी येथे महाराष्ट्रातून येणाऱ्या कांद्याचा होलसेल दर प्रति किलो 65 रुपये इतका झाला आहे. त्याचप्रमाणे एक नंबरी कांद्याचा किरकोळ दर प्रतिकिलो 80 रुपये मध्यम दर्जाच्या कांद्याचा दर प्रति किलो 50 रुपये आणि कमी दर्जाच्या काम कांद्याचा दर 20 रुपये प्रति किलो इतका झाला आहे.
दरवर्षी आम्ही 100 पोती कांदा बेळगांव एपीएमसी यार्डात आणत असतो. परंतु यंदा पावसाने नुकसान केल्यामुळे आम्हाला जेमतेम 10 पोती कांदा आणता आला, असे एका कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. याउलट आवक झाली नसल्यामुळे साठवलेल्या कांद्याचा दर वाढवावा लागत असल्याचे स्पष्टीकरण दुकानदारांनी दिले. एकंदर तुटवड्यामुळे कांद्याचा दर आणखीन वाढणार असल्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.