यावर्षीचा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार प्रा. ईमुनुल्ले चारपेंटींयेर या फ्रान्सच्या महिला संशोधकाला जाहीर करण्यात आला असून हा पुरस्कार मिळण्यात आपल्याला डॉ. समर्थ कुलकर्णी यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी गौरवपूर्वक सांगितले आहे. डॉ. समर्थ कुलकर्णी हे बेळगांवचे सुपुत्र आहेत हे विशेष होय.
यावर्षीचा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार प्रा. ईमुनुल्ले चारपेंटींयेर या फ्रान्सच्या महिला संशोधकाला जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी केलेल्या क्रिस्पर /कॅस 9 या जर्जर मानवी आजारांचे निवारण करणार्या अनुवंशिक औषधावरील संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. क्रिस्पर थेरापेटिक या संस्थेच्या चारपेंटीयर या सहसंस्थापक आहेत.
आनंदाची गोष्ट म्हणजे “क्रिस्पर थेरापेटिक” या संस्थेच्या सीईओ पदाची धुरा बेळगांवचे डॉ. समर्थ कुलकर्णी हे सांभाळत आहेत. नोबेल पारितोषिक विजेत्या चारपेंटीयेर यानी डॉ. समर्थ यांचा खास उल्लेख केला असून आपल्याला नोबेल पुरस्कार मिळवण्यासाठी सहकार्य करणारे डॉ. समर्थ कुलकर्णी आहेत असे नमूद केले आहे.
संशोधन तज्ञ डॉ. समर्थ हे प्रख्यात नेत्र चिकित्सक डॉ. सुरेश कुलकर्णी आणि निवृत्त प्राचार्या शोभा कुलकर्णी यांचे चिरंजीव आहेत. डॉ. समर्थ यांचे माध्यमिक शिक्षण बेळगांव मिलिटरी स्कूलमध्ये झाले असून जी. एस. एस. महाविद्यालयातून पदवीपूर्व तर आयआयटी खरकपूर इथून बीई व त्यानंतर अमेरिकेत एमएस व पीएचडी ही नॅनो टेक्नॉलॉजी या विषयांमध्ये केलेली आहे.
एक नोबेल पारितोषिक विजेता शास्त्रज्ञ आपल्या यशात डॉ. समर्थ कुलकर्णी यांचा वाटा असल्याचा उल्लेख करतो ही बेळगावकरांच्या दृष्टिकोनातून अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.