“मुलगी नको” ही मानसिकता समाजात आजही आहे. परंतु मुली जन्माला आल्या तरच समाज टिकणार आहे हे वास्तव आहे. आजही कित्येक आईबाप आपल्याला मुलगी झाली की तिला नाकारतात. अनेक कुमारी माता मुलींना जन्म देऊन रस्त्यावर टाकून जातात. “फेंके नही हमें दे” या शीर्षकाखाली मुली महत्त्वाच्या आहेत आणि त्यांना टाकू नका असा संदेश देत बेळगांवच्या एन. डी. जनसेवा ग्रुपने मुली वाचवण्यासाठी एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
एन. डी. जनसेवा ग्रुप ही बेळगावात नव्याने उदयास आलेली सेवाभावी संघटना आहे. धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते नारायण डी. धबाले उर्फ एन. डी. भाई हे या संघटनेचे संस्थापक – प्रमुख आहेत. गेल्या वर्षभरापासून एन. डी. जनसेवा ग्रुप ही संघटना विविध प्रकारे समाजोपयोगी कार्य करत आहे.
लॉक डाऊनच्या काळात गोरगरीब गरजू लोकांना या संघटनेतर्फे मोफत अन्नधान्य वाटप करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे गेल्या गणेश चतुर्थीच्या काळात एन. डी. जनसेवा ग्रुपने खानापूर तालुक्यातील जंगल प्रदेशातील आदिवासी लोकांना कपडेलत्ते व अन्नधान्य पुरवले आहे. याव्यतिरिक्त सदर संघटनेने कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या तसेच आई वडिलांचे छत्र हरपलेल्या अनाथ असलेल्या मुलांना आसरा मिळवून दिला आहे.
“फेंके नही हमें दे” हा बेवारस आणि अनाथ स्त्री जातीच्या अर्भकांना जीवदान देणारा आपल्या संघटनेचा पहिलाच महत्वाकांशी उपक्रम असल्याचे एन. डी. जनसेवा ग्रुपचे प्रमुख एन. डी. भाई यांनी “बेळगाव लाइव्ह” शी बोलताना सांगितले. मुलगी नको, ही मानसिकता समाजात आजही आहे. कित्येक आईबाप आपल्याला मुलगी झाली की तिला नाकारतात. अनेक कुमारी माता मुलींना जन्म देऊन रस्त्यावर टाकून जातात. ही मानसिकता अत्यंत चुकीची आहे. यासाठीच मुलगी वाचविण्यासाठी एन. डी. जनसेवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी “फेंके नही हमें दे” हा नवा उपक्रम सुरू केला असल्याचे त्यांनी सांगितले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. तेंव्हा रस्त्यावर टाकण्यात आलेले बेवारस अर्भक आदिंसंदर्भात नागरिकांनी 91 7090336579, 91 9632096144 अथवा 91 9164352311 या मोबाईल क्रमांक संपर्क साधावा असे आवाहन एन. डी. भाई यांनी केले आहे. तसेच यासंदर्भात अडचणीत सापडू शकणाऱ्या नागरिकांच्या नांवाबाबत गुप्तता बाळगली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.