कोविड काळात शासकीय नियमांचे पालन करून काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीला परवानगी द्यावी यासाठी पोलीस खात्याकडे गेल्या आठवडा भरा पासून समिती नेते पायपीट करताना दिसत आहेत.अनेकदा पोलीस आयुक्त कार्यालय असो वा पोलीस स्थानकांच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत.
भाषावार प्रांतरचनेत मराठी माणसावर अन्याय झाल्याच्या निषेधार्थ १ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारच्या विरोधात पाळण्यात येणाऱ्या काळ्या दिनी सायकल फेरी आणि मूक मोर्चाचे आयोजन करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
मार्केट ए सी पी सदाशिव कट्टीमनी यांच्या कार्यालयात माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, माजी आमदार मनोहर किणेकर आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत पोलीस कमिशनर, मार्केट एसीपी सदाशिव कट्टीमनी यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली.
या बैठकीत १ नोव्हेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या सायकल फेरीबाबत आणि मोर्चाबाबत चर्चा झाली.भारतीय राज्य घटनेला अनुसरून कायद्याच्या चौकटीत केंद्र सरकारच्या भाषावार प्रांत रचनेचा निषेध व्यक्त करायला परवानगी द्या अशी मागणी समितीने केली आहे.
जिल्हा प्रशासनाने राजयोत्सव कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू केली आहे मात्र दुसरीकडे समिती नेत्यांना केंद्रा विरोधात आंदोलन कऱण्यास अध्याप परवानगी दिली जात नाही विलंब केला जात आहे याबाबत समिती नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.