बेळगाव लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी सर्वानुमते उमेदवार निवडीसाठी काँग्रेस पक्षातर्फे आज सायंकाळी के पी सी सी सदस्यांची बैठक घेण्यात येणार आहे.
केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी शुक्रवारी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना उपरोक्त माहिती दिली. निवडणूक जिंकू शकेल या दृष्टिकोनातून पक्ष कार्यकर्ते ज्या उमेदवाराला निवडतील त्यांना प्राधान्याने निवडणुकीच्या उमेदवारीसाठी लक्षात घेतले जाईल, असेही शिवकुमार यांनी स्पष्ट केले.
राज्यातीलपूर परिस्थितीबाबत बोलताना ते म्हणाले की, भाजप सरकार पूर परिस्थिती तसेच त्यानंतरचे मदत कार्य हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. एकाही पूरग्रस्ताला अद्यापपर्यंत एक पैसाही मिळालेला नाही. दरम्यान शेकडो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार मात्र भाजप सत्ताधाऱ्यांनी केला आहे.
केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहताना अंगडी यांचे पार्थिव याठिकाणी आणून अंत्यविधी व्हावयास हवे होते. बेळगांवात लष्करी इतमामात हा विधी व्हावयास हवा होता, असेही डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.
खासदार सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर भाजपचा उमेदवार कोण असेल? याची चर्चा सर्वत्र रंगली असताना भाजपचा उमेदवार हा अंगडी कुटुंबातील सदस्य असेल की बाहेरील? याबाबत सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. अंगडी कुटुंबीयांनी देखील पोटनिवडणुकीची उमेदवारी मागितली आहे. मात्र भाजप हाय कमांडर याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे एका स्थानिक मंत्र्याने सांगितल्यामुळे भाजप बरोबर आता काँग्रेसचा उमेदवार कोण असेल याचीही चर्चा सुरू झाली आहे. शहरातील काँग्रेस कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार व कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी हे तिघे एकत्र येणार आहेत. बेळगावात आज रात्री त्यांची बैठक होणार असून काँग्रेसचा संभाव्य उमेदवार कोण असेल याबाबत त्यांच्यात चर्चा होणार आहे. मागील निवडणुकीप्रसंगी सुरेश अंगडी यांच्याविरुद्ध काँग्रेसकडे तगडा उमेदवार नव्हता. त्यामुळे व्ही. एस. साधुनावर यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु मोदीची लाट आणि त्यातच साधुनावर हे कमकुवत उमेदवार होते. बेळगांव शहर व ग्रामीण भागात त्यांचा संपर्क नव्हता. परिणामी 3 लाखाहून अधिक मतांनी ते पराभूत झाले होते. काँग्रेससाठी हा दारुण पराभव होता.
मागील 2014 च्या निवडणुकीत लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अंगडी यांना चांगली लढत दिली होती. परंतु दुर्दैवाने 70 हजार मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे यावेळी काँग्रेस कोणता उमेदवार देणार? हा उमेदवार लिंगायत असणार की बिगर लिंगायत? याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे लिंगायत म्हणून प्रकाश हुक्केरी चिकोडीहून बेळगांवात निवडणूक लढवणार की काँग्रेस अंजली निंबाळकर यांच्या स्वरूपात मराठा समाजाला उमेदवारी देणार? किंवा पुन्हा लक्ष्मी हेब्बाळकर यांचे नांव पुढे येणार इत्यादी अंदाज राजकीय वर्तुळातसह सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत आहेत. दरम्यान आज रात्री होणाऱ्या बैठकीत काँग्रेसच्या संभाव्य उमेदवाराबाबत चर्चा होणार आहे. या चर्चेमध्ये सतीश जारकीहोळी यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.