बेळगांव हे अखंड कर्नाटकाचा अविभाज्य अंग असून महाराष्ट्रातील नेते कितीही ओरड करत असले तरी चंद्र-सूर्य जोपर्यंत आहेत तोपर्यंत बेळगांव कर्नाटकात राहणार, असे ठाम वक्तव्य उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केले आहे.
शहरात आज शनिवारी आयोजित पत्रकार परिषदे प्रसंगी उपमुख्यमंत्री सवदी यांनी उपरोक्त वक्तव्य केले. कर्नाटक सरकारतर्फे साजरा केला जाणारा 1 नोव्हेंबर राज्योत्सव दिन आणि मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे पाळला जाणारा काळा दिन यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मंत्री एकनाथ शिंदे यांनी काळा दिनासंदर्भात केलेल्या वक्तव्याच्या अनुषंगाने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी बोलत होते. बेळगांव हे कर्नाटकाचे अविभाज्य अंग असल्यामुळेच याठिकाणी सुवर्ण विधानसौध उभारण्यात आली आहे.
वर्षातून एकदा याठिकाणी अधिवेशन भरवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील नेते मंडळी बेळगावसंदर्भात जी व्यक्तव्य करतात ती येथील म. ए. समिती सारख्या संघटना जिवंत रहाव्यात म्हणून असतात. महाराष्ट्रातील नेते फक्त आपल्या राजकीय स्वार्थासाठी असे करतात बाकी काही नाही. तरीही राज्योत्सव दिनी म. ए. समितीकडून कांही अनुचित प्रकार घडला तर कायद्याच्या चौकटीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे सवदी यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील ज्या कोणी कर्नाटक राज्योत्सव दिनी काळा दिन पाळा असे आवाहन केले आहे. त्यांनी बेळगावात येऊन तसे आवाहन करून दाखवावे मग आम्ही त्याला चोख उत्तर देऊ. मुंबईत बसून एखादे वक्तव्य करणे फार सोपे आहे. महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी ते राज्याच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेत असते, त्याचप्रमाणे कर्नाटकातही भाजप, काँग्रेस अथवा कोणत्याही पक्षाचे सरकार येऊ दे त्यांच्या दृष्टीने बेळगांव हे कर्नाटकचेच अविभाज्य अंग असते, असे उपमुख्यमंत्री सवदी यांनी सांगितले.
याप्रसंगी जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी, रमेश कत्ती आदी नेते मंडळी उपस्थित होती.