बेळगावमधील लोकसभा निवडणुका अजून जाहीर झाल्या नाहीत. त्यामुळे कोणतेही इच्छुक उमेदवार अजूनतरी असलेले पुढे आले नाहीत. काँग्रेसच्यावतीने कोणत्याही जातीचा, धर्माचा विचार न करता जो उमेदवार लोकप्रिय आहे, ज्याच्यात जिंकण्याची क्षमता आहे, अशा उमेदवारालाच तिकीट जाहीर केले जाईल, असे वक्तव्य केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केले आहे.
आज बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी हि माहिती दिली आहे. बेळगावच्या लोकसभा पोटनिवडणुकीसदंर्भात पक्षाने अजून कोणतीही चर्चा केली नसून निवडणूक जाहीर झाल्यानंतरच उमेदवार निवडीची प्रक्रिया केली जाईल, आणि चर्चेनंतरच उमेदवार जाहीर केला जाईल. पुढील १५ दिवसात या संदर्भात बैठक आयोजित करण्यात येईल, आणि या बैठकीत या विषयावर चर्चा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिरा, आर. आर. नगर येथे पक्षाच्या अंतर्गत अडचणींमुळे मागील वेळी पराभव पत्करावा लागला. परंतु येत्या निवडणुकीत पुन्हा या मतदार क्षेत्रात उमेदवार उभा करून, आम्ही एकत्र येऊन निवडणुकांना सामोरे जाऊ, आणि निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करू असे ते म्हणाले.
बेळगावमध्ये नदीतीरावर उद्भवलेल्या पूर्वपरिस्थितीबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले, कि या मुद्द्यावर विधानसभेत चर्चा करण्यात आली. परंतु सरकारने योग्य उत्तरे दिली नाहीत. यासंबंधी जनतेलाच उत्तर देण्याचा पवित्रा सरकारने घेतला असल्याचे ते म्हणाले.
शुक्रवार दि. २ ऑकटोबर रोजी गांधी जयंती निमित्ताने बेळगावमध्ये काँग्रेस कार्यालयाचे उदघाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनाही आमंत्रित केले असल्याची माहितीहि सतीश जारकीहोळी यांनी दिली.