शहरातील रविवार पेठ येथील महात्मा फुले मार्केटमधील (पूर्वीचे कांदा मार्केट) दुकानांचे गाळे बेकायदेशीररित्या खाली करून मार्केटला सील ठोकल्यासंदर्भात महापालिका आयुक्तांना योग्य समज द्यावी आणि दुकान गाळे पूर्ववत खुले करण्यास सांगावे, अशी मागणी महात्मा फुले मार्केट येथील गाळेधारक व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
बेळगाव महापालिकेने महात्मा फुले मार्केट येथील गाळ्यांचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप ठेवून सदर मार्केटला मंगळवारी सील ठोकले. या प्रकाराच्या विरोधात सदर मार्केटमधील संतप्त गाळेधारकांनी आज गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन सादर करून उपरोक्त मागणी केली आहे. जिल्हाधिकार्यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
महात्मा फुले मार्केटची संबंधित जागा ही वक्फ बोर्डाची असून उताराही त्यांच्याच नांवावर आहे. तेंव्हा महापालिकेने कोणत्या अधिकाराने हे मार्केट सील करण्याची कारवाई केली? येथील गाळेधारक गरीब कुटुंबातील आहेत. त्यांच्या दुकान गाड्यांना टाळे ठोकण्यात आल्यामुळे या सर्वांच्या कुटुंबियांवर उपासमारीची पाळी येणार आहे. विशेष म्हणजे मार्केटमधील दुकान गाळ्यांसंदर्भात बेळगांव न्यायालयासह उच्च न्यायालयात खटले प्रलंबित आहेत. ही वस्तुस्थिती असताना कोणतीही पूर्वसूचना अर्थात नोटीस न देता अथवा आदेशाची प्रत न दाखवता गेल्या मंगळवारी महात्मा फुले मार्केटमधील दुकाने गाळ्यांना टाळे ठोकून मार्केट पत्रे ठोकून सील करण्यात आले आहे. हा प्रकार बेकायदेशीर असून या प्रकरणी तात्काळ लक्ष घालावे तसेच यासंदर्भात महापालिका आयुक्तांना योग्य ती समज देऊन सदर मार्केट पूर्ववत खुले करण्याची सूचना करावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणतीही नोटीस अथवा पूर्वसूचना न देता पोलीस बळाचा वापर करून आमच्या दुकानांना टाळे ठोकून मार्केट सील केले आहे. यासंदर्भात त्यावेळी जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे देऊन, हवे तर मनपा आयुक्तांना जाऊन भेटा असे उद्धट उत्तर आम्हाला देण्यात आले आमच्या गाळ्यांना टाळे ठोकून अन्याय करण्यात आला आहे. मार्केटमधील सदर गाळ्यांमध्ये आम्ही व्यापार करत नव्हतो. हे गाळे फक्त शिल्लक भाजीपाल्यासह बुट्ट्या पोती आदी साहित्य ठेवण्यासाठी वापरत होतो. मार्केटला सील ठोकण्याचा प्रकारामुळे आमच्यावर मोठा अन्याय झाला असून आमची दुकान गाळे तात्काळ पूर्ववत खुले करावेत अशी मागणी मुख्तयार, अझीज आणि मैनुद्दीन मोहम्मदसाब तांबोळी या भाजीपाला व्यापाऱ्यांनी “बेळगांव लाईव्ह” शी बोलताना केली.
महापालिकेची दमदाटी फक्त गरिबांवरच का? असा प्रश्न आजकाल पडू लागल्याचे महात्मा फुले भाजी मार्केटमधील व्यापार्यांच्या प्रतिनिधीने बोलताना सांगितले. कोणतीही नोटीस न देता अथवा कागदपत्रे न दाखवता कोणत्या आधारावर ही कारवाई करण्यात आली? असा सवालही त्यांनी केला. सदर जागा वक्फ बोर्डाची असताना तेथे जाऊन गोरगरीब व्यापाऱ्यांना रस्त्यावर आणण्याचा अधिकार महापालिकेला कोणी दिला? दुकान गाळ्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना महापालिका सील ठोकण्याची कारवाई कशी काय करू शकते हा मोठा प्रश्न आहे. सध्या हा प्रकार महात्मा फुले मार्केटमध्ये घडला आहे, उद्या तो सर्व शहरात कोठेही घडू शकतो. तेंव्हा याला त्वरित आळा करणे गरजेचे आहे, असेही व्यापार्यांच्या प्रतिनिधीने सांगितले. तसेच उपरोक्त निवेदनाची प्रत मुख्यमंत्र्यांसह जिल्हा पालक मंत्री रमेश जारकीहोळी यांनाही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी महात्मा फुले मार्केट (कांदा मार्केट) येथील बहुसंख्य व्यापारी उपस्थित होते.