प्रसिद्ध संगीतकार के. कल्याण यांच्या पत्नीसह सासू सासऱ्यांचे अपहरण करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या बागलकोट जिल्हा, बिळगी तालुक्यातील बुदीहाळ या गावातील शिवानंद बसवराज वाली (वय ३८) याला जामीन मिळाला आहे.
सदर प्रकरणात के. कल्याण यांच्या घरी घरकाम करणाऱ्या गंगा कुलकर्णी या महिलेसमवेत कट रचून शिवानंद वाली या मांत्रिकाने के. कल्याण यांची पत्नी आणि त्यांच्या सासू सासऱ्यांचे अपहरण केले होते. यासोबत मालमत्ता हडप करण्याचेही प्रयत्न करण्यात आले.
याविरोधात माळमारुती पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला होता. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, व्दितीय न्यायालयाकडे शिवानंद वाली या मांत्रिकाने जामिनासाठी अर्ज केला होता. आज या जामीन अर्जाला कोर्टाने मंजुरी दिली आहे.
जामीनपत्रात 50 हजारांचे वैयक्तिक हमीपत्र तसेच साक्षीदारांना धमकावू नये या अटींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.या खटल्यात अँड. श्रीधर मुतगेकर, प्रकाश आर. आणि अश्विन कट्टी यांनी काम पाहिले.