गॅंगवाडी येथे घडलेल्या युवकाच्या भीषण खून प्रकरणी अटक करण्यात आलेल्या या दोघा आरोपींना आज सकाळी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांची तीन दिवसासाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
दसऱ्या दिवशी म्हणजे गेल्या रविवारी मध्यरात्री गॅंगवाडी -शिवबसवनगर परिसरात कांही अज्ञातांनी पाठलाग करून शहबाज शेरखान पठाण (वय 24, दुसरा क्रॉस संगमेश्वरनगर) या युवकाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून भीषण खून केला होता. याप्रकरणी माळ मारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी तात्काळ तपास चक्रे फिरवून बसवराज होळ्याप्पा दड्डी (वय 26) आणि बसवाणी सिद्धाप्पा नाईक (वय 28, दोघेही रा. मुत्त्यानट्टी) यांना अटक केली होती.
या दोन्ही आरोपींना आज मंगळवारी सकाळी जेएमएफसी तृतीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायाधीशांनी सदर आरोपीना तीन दिवसांच्या न्यायालयीन कोठडीचा आदेश दिला आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर बसवराज व बसवानी या दोघा आरोपींना पोलिस बंदोबस्तात हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाकडे नेण्यात आले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर अधिक तपास करीत आहेत. लवकरच खुनासाठी वापरण्यात आलेली तीक्ष्ण हत्यारे जप्त करण्याबरोबरच आणखी कांही आरोपींना गजाआड करण्यात येण्याची शक्यता आहे.