बेळगांव कृषी उत्पन्न बाजार पेठेमध्ये अर्थात एपीएमसी मार्केट यार्डमध्ये इराणचा कांदा दाखल झाला आहे. तथापि स्थानिक लोकांच्या चविला चालत नसल्यामुळे दर कमी असूनही इराणी कांद्याला जास्त मागणी नाही.
बेळगांव एपीएमसी भाजी मार्केटमध्ये इराणचा कांदा दाखल झाला असून या लाल भडक कांद्याचा दर 6000 रुपये प्रति क्विंटल इतका आहे. बेळगांवच्या कांद्याच्या तुलनेत या कांद्याचा दर प्रतिकिलो 60 रुपये इतका कमी असला तरी स्थानिक लोकांच्या चवीला चालत नसल्यामुळे छान लाल भडक दिसत असला तरी या कांद्याला फारशी मागणी नाही. मार्केट यार्डातील के. सुंदरदास, दीपक ट्रेडर्स आणि माणिक ट्रेडर्स यांच्याकडे सध्या हा इराणी कांदा उपलब्ध आहे.
बेळगावी कांद्याचा दर सध्या 7000 ते 7500 रुपये प्रति क्विंटल इतका झाला आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून या कांद्याचा दर प्रति किलो 75 रुपये इतका स्थिर आहे. लाल भडक इराणी कांद्याच्या तुलनेत बेळगांवच्या साधारण गुलाबी छटा असणाऱ्या कांद्याला सध्या बाजारात मागणी आहे. तथापि पूर्वीच्या तुलनेत यंदा हॉटेल वगैरेबंद असल्यामुळे कांद्याला म्हणावी तशी मागणी नसल्याचे मत एपीएमसीमधील प्रसिद्ध होलसेल व्यापारी ए पी एम सी सदस्य महेश कुगजी यांनी बेळगांव लाईव्हशी बोलताना व्यक्त केले.
दरम्यान, एपीएमसी भाजी मार्केटमध्ये आज शनिवारी बेळगांवच्या बटाट्याला या महिन्यातील आत्तापर्यंतचा उच्चांकी दर मिळाला आहे.
देवरवाडी येथील शेतकऱ्याचा हा बटाटा असून त्याने आज 110 पोती बटाटा आणला होता. या बटाट्याला 5,300 रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला. मागील महिन्यात बेळगांव बटाट्यांचा उच्चांकी दर 3,500 रुपये प्रति क्विंटल इतका होता, अशी माहिती कुगजी यांनी दिली.