पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील काकतीनजीक असलेल्या बर्डे धाबा जवळ रस्त्यावर असहाय्य अवस्थेत पावसात भिजत पडलेल्या नाशिक येथील एका मानसिक स्थिती बिघडलेल्या युवकाला “हा माझा धर्म” संघटनेच्या विनायक केसरकर यांनी सुखरूप स्वगृह पाठवून देण्याची व्यवस्था केल्याची घटना नुकतीच घडली.
काकती येथील “हा माझा धर्म” या पशुदया -सेवाभावी संघटनेचे प्रमुख विनायक केसरकर हे राष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेने जखमी झालेल्या एका गाईला वाचविण्यासाठी बुधवारी सायंकाळी बर्डे धाब्यानजीक गेले होते. त्यावेळी रस्त्यावर एक युवक असहाय्य स्थितीत पडल्याचे पाहून केसरकर यांनी त्याची चौकशी केली. तेंव्हा संबंधित युवकाची मानसिक स्थिती बिघडली असल्याचे आणि तो घरातून हरवला असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
प्रारंभी संबंधित युवक असंबद्ध बडबडत होता, परंतु नंतर त्याने आपण नाशिक येथील असल्याची माहिती दिली. तसेच आपण नाशिक येथील उकल मेटल्स खाजगी या कंपनीत कामाला होतो असेही सांगितले.
सदर सुशिक्षित युवकांची अवस्था पाहून विनायक केसरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दया आली आणि त्यांनी त्या युवकाला प्रथम खाऊपिऊ घातले. त्यानंतर त्याच्याकडून त्याच्या कंपनीचा गुगल सर्चद्वारे पत्ता मिळवून त्या ठिकाणी संपर्क साधला. कंपनीतील लोकांनी त्या युवकाने नोकरी सोडली असल्याचे सांगून त्याच्या भाऊजींचा पत्ता दिला. तेंव्हा भाऊजींशी संपर्क साधून विनायक केसरकर यांनी बुधवारी रात्रीच त्या युवकाला पुणेमार्गे नाशिकला पाठवण्याची व्यवस्था केली.
त्यानंतर काल गुरुवारी सकाळी संबंधित युवक आपल्या घरी नाशिकला सुखरूप पोहोचला याची खातरजमा केली. विनायक केसरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या मदतीबद्दल त्या मानसिक स्थिती बिघडलेल्या युवकाच्या भाऊजींनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.