सण म्हटलं कि महिला वर्गाची धामधूम असते. शृंगारासाठी जास्तीत जास्त वेळ देणाऱ्या महिलांना सण म्हणजे एक पर्वणी असते. परंतु सर्वसामान्य महिला वगळता आरोग्य विभागात काम करणाऱ्या महिला कर्मचारी या आरोग्यदूतांचे काम करत आहेत.
नवरात्रीतील नऊ दिवसात नऊ विविध रंगात वेशभूषा करणाऱ्या सर्वसामान्य महिलांप्रमाणे आरोग्य विभागात काम करणाऱ्या महिलांना मात्र सण आणि उत्सव याचा तसा फारसा संपर्क आला नाही.
संपूर्ण जग आणि देशात कोविड परिस्थिती हाताळताना आपल्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा असामान्य असे कार्य करणाऱ्या महिला आरोग्य विभागात कार्यरत आहेत. कोडोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या लॅब टेक्निशियन ज्योती होसट्टी यांनी ‘बेळगाव लाईव्ह’ शी बोलताना सांगितले कि, गेले नऊ दिवस सुरु असणाऱ्या नवरात्रीत अनेक महिलांना श्रुंगार करताना आम्ही पहिले.
परंतु देशातील आणि पर्यायाने बेळगावमधील कोविड परिस्थिती पाहता यंदा नवरात्र साजरी करण्यासाठी वेळ मिळाला नाही. मंदिरातील देवापेक्षा जनतेची सेवा करून आशीर्वाद मिळवणे हेच आम्हाला योग्य वाटले. शिवाय यंदाचा नवरात्रोत्सव आम्ही पीपीई किट मध्ये साजरा केला. आणि जनतेची सेवा करताना समाधान मिळाले. अशा संकटकाळात आपण कुणाच्यातरी मदतीला येऊ शकलो, यातच देव मिळाला. अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
जनतेच्या सेवेत रुजू असणाऱ्या अशा असंख्य महिला कर्मचारी आहेत. त्या आरोग्यदूतांचेच कार्य पार पाडत आहेत, यात शंका नाही.