येत्या कालावधीत ग्रामपंचायत निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात राजकीय मंडळींची तयारी सुरु असतानाच अनेक गावातील नागरी समस्यांना तोंड फुटले आहे. हिंडलगा गावातील महादेव गल्लीतील नागरिकांनी रस्त्याच्या समस्येसंदर्भात आंदोलन छेडले आहे.
अनेक वर्षे खराब असलेला रस्ता दुरुस्त करण्यासाठी नागरिकांकडून मागणी करण्यात येत होती. त्यानुसार रस्ता दुरुस्तीसाठी खडी घालण्यात आली आहे. परंतु मागील एक वर्षांपासून ही खडी जशीच्या तशी पडून आहे. या खडीवरुन मार्गक्रमण करताना अडचण होत आहे. त्याचप्रमाणे दुचाकी वाहनांचे अपघात होण्याचेही प्रमाण वाढले आहे. या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी ग्रामपंचायत अध्यक्ष, तसेच या विभागातील ग्राम पंचायत सदस्यांना वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत.
हा रस्ता त्वरित दुरुस्त करून काँक्रीटीकरण करण्याची मागणी केली आहे. परंतु मागील एक वर्षांपासून याठिकाणी कोणताही लोकप्रतिनिधी पोहोचला नसून नागरिकांना या रस्त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. याप्रश्नी कोणीही लक्ष देण्यास तयार नाही त्यामुळे महादेव गल्लीतील रहिवाशांनी आज आंदोलन छेडले. हा रस्ता त्वरित दुरुस्त करून काँक्रीटीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या आंदोलनात विमल काकतकर, अनुसया लोहार, मल्लव्वा आपटेकर, कृष्णाबाई लोहार, गीता चौगुले, गीता कुडचीकर, गीता हट्टीकर, रेणुका जप्पाळदड्डी, ममता सावरकर, कल्पना सांगावकर, सुरेखा अगसगेकर, अनुषा अगसगेकर, गंगुबाई कुडचीकर, बबिता कोकितकर, शारदा खांडेकर, सावित्रा लोहार, अनिता उचगावकर, वंदना कडोलकर, रेणुका कोकितकर यांच्यासह अनेक रहिवासी सहभागी झाले होते.
ग्रामीण भागाचा विकास सध्या खुंटला असून रस्ते, पाणी, गटारींची समस्या नागरिकांना भेडसावत आहे. लवकरच ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी इच्छुकांनी कंबर कसली आहे. सध्या कोणत्याही लोकप्रतिनिधींकडून विकासकामांची पूर्तता होणे शक्य नाही. परंतु येत्या निवडणुकीत ग्रामीण भागातील आपापल्या विभागात असलेल्या समस्या आणि त्यांचे निराकरण करणारा उमेदवार जनतेला अपेक्षित आहे. जनता जागरूक झाली आहे. त्यामुळे केवळ सत्तेसाठी नाही तर जनतेच्या हितासाठी निवडणूक लढवून ग्रामीण भागाचा विकास करणे आवश्यक आहे.