आगामी बेळगांव महापालिका निवडणूक डिसेंबरमध्ये तर ग्रामपंचायत निवडणुका नोव्हेंबरमध्ये होणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार जोरदार तयारीला लागले आहेत.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बेळगांव महापालिकेची निवडणूक येत्या डिसेंबर च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. त्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने तयारीही सुरू केली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या अधिकार्यांच्या बैठका घेणे, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, प्रत्येक वार्ड बाबतची माहिती गोळा करणे आदी कामे सुरू झाले आहेत. उच्च न्यायालयाने महापालिकेच्या प्रलंबित निवडणुका तात्काळ घेण्याचा आदेश दिल्यामुळे जुन्या आरक्षणाप्रमाणे आणि वॉर्ड रचनेप्रमाणे आगामी महापालिका निवडणूक होईल असा 80 टक्के अंदाज आहे.
एखाद्यावेळेस बोर्ड आरक्षणात बदल झालेल्या तो 10 टक्के असेल असाही बोलले जात आहे. जर जुन्या आरक्षण आणि बोर्ड रचनेप्रमाणे आगामी महापालिका निवडणूक झाल्यास याचा सर्वाधिक फटका वॉर्ड पुनर्रचना होईल असे गृहीत धरून कामाला लागलेल्या नव्या उमेदवारांना बसणार आहे. जुन्या वार्ड रचनेप्रमाणे आणि आरक्षणाप्रमाणे निवडणूक झाल्यास या उमेदवारांच्या उत्साहावर विरजण पडणार हे निश्चित आहे.
विश्वासनीय सूत्रानुसार बेळगांव महापालिकेची निवडणूक सलग तिसऱ्यांदा जुने आरक्षण आणि वॉर्ड रचनेनुसार होणार आहे. कांही महत्त्वाकांक्षी राजकीय नेते बेळगांव महापालिकेचे वाॅर्ड निहाय आरक्षण बदलावे आणि वाॅर्ड पुनर्रचना व्हावी यासाठी प्रयत्नशील असले तरी सध्याची कोविड परिस्थिती पाहता ते शक्य नाही. त्यामुळे यावेळची महापालिका निवडणूक येत्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जुन्या आरक्षण आणि वॉर्ड रचनेनुसारच होणार हे जवळजवळ निश्चित आहे.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तात्काळ घेतल्या जाव्यात असा आदेश उच्च न्यायालयाने काढल्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका देखील लवकरात लवकर घेण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासन तयारीला लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार बेळगांव जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावधीमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. सदर निवडणुकीची कुणकुण लागल्याने इच्छुक उमेदवारांनी आत्तापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.