बेळगांव महानगरपालिका कार्यक्षेत्रात दुचाकीवर मागे बसणाऱ्या व्यक्तीसाठी असलेला हेल्मेटसक्तीचा नवा आदेश शिथील करण्यात यावा, अशी मागणी जायंट्स ग्रुप ऑफ बेळगांव (मेन)तर्फे पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
शासनाने नव्या आदेशाद्वारे दुचाकीवर मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट सक्ती लागू केली आहे. यासंदर्भात जायंट्स ग्रुप ऑफ बेळगांव (मेन)तर्फे अध्यक्ष संजय पाटील व मदन बामणे यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज गुरुवारी सकाळी पोलीस आयुक्त डाॅ. के. त्यागराजन यांना सादर करण्यात आले.
निवेदनाचा स्वीकार करून पोलीस आयुक्तांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. गेल्या 35 वर्षांपासून जायंट्स ग्रुप ऑफ बेळगांव (मेन) बेळगांव शहरात सामाजिक कार्य करत आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सध्या सर्वसामान्य नागरिकांचे जीवन दयनीय झाले आहे. लाॅक डाऊनमुळे उद्योगधंदे कोसळले आहेत.
या परिस्थितीत दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट सक्ती करणे ही बाब समर्थनीय नाही. तेंव्हा महापालिका कार्यक्षेत्रातील हेल्मेट सक्तीचा आदेश शिथील करण्यात यावा, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी संजय पाटील व मदन बामणे यांच्यासह एस. एस. भोसले, मोहन कारेकर, भाऊ किल्लेकर, अशोक हलगेकर, भारत गावडे, विकास कलघटगी, अरुण काळे, माधव बेळगावकर, दामोदर किल्लेकर, अविनाश पाटील आदी उपस्थित होते.