बेळगांव -येळ्ळूर रस्त्यावर असलेल्या बळ्ळारी नाल्यावरील पुलाच्या ठिकाणी एका बाजूला मोठ्या प्रमाणात टाकाऊ वस्तू आणि कचऱ्याचे ढिगारे साचले असून त्यांची तात्काळ उचल केली जावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
बेळगांव -येळ्ळूर रस्त्यावरील बळ्ळारी नाल्याच्या ठिकाणी असलेल्या पुलाच्या एका बाजूला मोठ्या प्रमाणात केरकचरा आणि टाकाऊ वस्तू फेकून देण्यात आल्या आहेत. साचलेल्या केरकचऱ्याच्या या ढिगार्यामुळे याठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे.
त्यामुळे याठिकाणी शेतीच्या कामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच या रस्त्यावरून ये-जा करणार्या नागरिकांना कुत्र्यांच्या भीतीमुळे पुल ओलांडताना जीव मुठीत धरून जावे लागत आहे.
बळ्ळारी नाल्याच्या पुलावरील हा कचरा गेल्या अनेक दिवसापासून साचून पडल्यामुळे पुलावर दुर्गंधीचे वातावरणही निर्माण झाले आहे. या कचर्याच्या ढिगार्यांमध्ये मृत व्यक्तींचे अंथरूण-पांघरूण, गाद्या, रिकामे बॉक्स, अडगळीचे साहित्य आदी टाकाऊ वस्तूंचा समावेश असल्यामुळे या पुलाला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून पडून असलेल्या पुलावरील कचर्याच्या ढिगार्याकडे संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून साफ दुर्लक्ष केले जात आहे.
परिणामी तीव्र नाराजी व्यक्त होत असून हा कचरा हलवण्याची जबाबदारी कोणाचीच नाही का? असा संतप्त सवाल या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहन चालक आणि नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.