दिवसेंदिवस वाढत चाललेला महागाईचा आलेख चढताच आहे. भाजीपाल्याच्या वाढत्या दरामुळे गृहिणींचे बजेट याआधीच कोलमडले आहे. त्यानंतर पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या कडधान्याचे दरही वाढले आहेत. आर्थिक मंदीच्या झाला सोसत असतानाच कोरोनाचा कहर आणि कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊननंतर विस्कटलेली आर्थिक घडी यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. अशातच अतिवृष्टी, महापूर, अवकाळी यामुळे शेतीची अवस्थाही बिकट झाली आहे. सर्वसामान्यांबरोबरच शेतकऱ्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बाजारातील आर्थिक उलाढाल मंदावलेलीच आहे. त्यात जीवनावश्यक वस्तूंचे दरही गगनाला भिडत आहेत. नोकरी-व्यवसायावर आलेली संक्रात यामुळे खरेदीवरही परिणाम जाणवत आहे. गेल्या महिना – दीड महिन्याच्या कालावधीत भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे गृहिणींना स्वयंपाक खोलीचे बजेट सांभाळणे कठीण झाले आहे. भाजीपाल्याला पर्याय म्हणून सर्रास कडधान्यांचा वापर करण्यात येतो. परंतु बाजारातील वाढलेल्या मागणीमुळे कडधान्याच्या दरातही वाढ झाली असून याची झळ आता सर्वसामान्यांना सोसावी लागत आहे. याशिवाय खाद्यतेलाच्या दरातही वाढ झाली आहे.
यंदा झालेल्या पावसामुळे अनेक भागातील शेती पाण्याखाली आली होती. याचाच परिणाम म्हणून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी बाजारात होणारी आवक मंदावली आहे. गेल्या १५ ते २० दिवसांच्या कालावधीत कडधान्यासोबतच डाळींच्या दरानेही शंभरी पार केली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या आहाराचे बजेट महागाईच्या झळा सोसत आहे.
१०० ते १०५ रु. प्रतिकिलो मुगडाळ, ८० ते ८२ रु. प्रतिकिलो मासूरडाळ, ७५ ते ८० रु. किलो हरभरा डाळ, १०० ते १३० रु. प्रतिकिलो उडीदडाळ असा डाळींचा सरासरी दर आहे. तर मूग ९५ ते १०० रु. प्रतिकिलो, काळे वाटाणे ६५ ते ७० रु. प्रतिकिलो, मटकी ९० ते १०० रु. प्रतिकिलो, लाल चवळी 60 ते ६५ रु. प्रतिकिलो, नाशिक मसूर ८० ते ८५ रु. प्रतिकिलो, जवारी मसूर १६० ते १६५ रु. प्रतिकिलो असे कडधान्याचे दर आहेत. ऐन सणासुदीच्या काळात झालेली धान्यांच्या दरातील ही वाढ सर्वसामान्यांना आर्थिक विवंचनेत टाकणारी ठरत आहे.