केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बेळगांव लोकसभेच्या जागेसाठी होणारी आगामी पोट निवडणूक लढविण्यास माजी खासदार प्रकाश हुक्केरी सध्या उत्सुक आहेत.
अंगडी कुटुंबातील सदस्य प्रतिस्पर्धी नसल्यास आपण काँग्रेस किंवा भाजप कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढविण्यास सज्ज असल्याचे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले आहे. परिणामी प्रकाश हुक्केरी भाजपमध्ये जाणार की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
चिकोडी तालुक्यातील एका खाजगी कार्यक्रमामध्ये बोलताना माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांनी उपरोक्त वक्तव्य केले आहे. सुरेश अंगडी भाजपमध्ये होते तर मी काँग्रेसमध्ये आहे. आम्हा दोघात घनिष्ठ मैत्री होती. त्यामुळे आगामी पोटनिवडणुकीसाठी अंगडी कुटुंबातील कोणालाही तिकीट दिल्यास मी ही निवडणूक लढवणार नाही. मात्र अंगडी कुटुंब वगळून इतर कुणालाही तिकीट दिल्यास मी निवडणूक रिंगणात उतरण्यास तयार आहे. काँग्रेस असो किंवा भाजप कोणत्याही पक्षाकडून तिकीट मिळाल्यास आपण निवडणूक लढवणार असल्याचे हुक्केरी यांनी स्पष्ट केले.
मी सक्रिय राजकारणातून अद्याप निवृत्त झालेला नसून यापुढे देखील जनसेवा करण्याची शक्ती मला देवाने दिली आहे. बेळगांव लोकसभा मतदार संघ माझ्यासाठी नवीन नाही. जिल्हा पालकमंत्री आणि विधान परिषद सदस्य म्हणून मी बेळगाव लोकसभा मतदारसंघात काम केलेले आहे. भाजपकडून अंगडी कुटुंबाला तिकीट दिल्यास मी जबाबदारी घेऊन त्यांच्या विजयासाठी परिश्रम घेईन, असेही हुक्केरी यांनी सांगितले आहे.
दरम्यान, माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या उपरोक्त वक्तव्यामुळे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून हुक्केरी भाजपमध्ये जाणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. प्रकाश हुक्केरी हे चिकोडी मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे बडे नेते म्हणून सुपरिचित आहेत. त्यांचे चिरंजीव गणेश हुक्केरी हे काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार आहेत.