भारतातील नामांकित वकील आणि ब्रिटनमधील क्वीन्स कौन्सिल तसेच भारताचे माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे हे पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहेत. पुढील आठवड्यात ते बोहल्यावर चढणार असून त्यांचे वय ६५ वर्षे इतके आहे.
साळवे यांनी गेल्या महिन्यात आपली पत्नी मीनाक्षी साळवेपासून कायदेशीर घटस्फोट घेतला आहे. त्यांची पत्नी मीनाक्षी यांच्यासोबत त्यांनी 38 वर्षे संसार केला असून त्यांना दोन मुली आहेत. येत्या 28 ऑकटोबर रोजी लंडन येथील चर्चमध्ये त्यांची मैत्रीण कॅरोलिन ब्रॉसर्डशी लग्न करणार आहेत. त्यांची होणारी दुसरी पत्नी कॅरोलिन ब्रॉसर्ड यांचाही हा दुसरा विवाह असून त्यांचे वय ५६ आहे.
कॅरोलिन ब्रॉसर्ड ५६ वर्षांच्या आहेत तर त्यांनाही १ मुलगी आहे. साळवे यांनी धर्मांतर करून ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते कॅरोलिन ब्रॉसर्ड यांच्या संपर्कात असून एका कला प्रदर्शनात त्यांची ओळख झाली होती. कॅरोलिन ब्रॉसर्ड या व्यवसायाने कलाकार आहेत. या दोन वर्षात त्यांचे नाते अधिक घट्ट झाले आहे.
हरीश साळवे यांची बेळगावच्या सीमाप्रश्नाबाबतही महाराष्ट्राची बाजू मांडण्यासाठी नियुक्ती झाली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ बैठकीत मार्च २०१९ साली हा निर्णय घेण्यात आला होता. कुलभूषण जाधव प्रकरणातही त्यांनी भारत सरकारची बाजू मांडली होती. हरीश साळवे हे सुरुवातीपासूनच त्यांच्या कौशल्यामुळे प्रख्यात वकील होते.
त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय बाबींमध्ये सरकारची बाजू मांडली आहे. याशिवाय तत्कालीन परराष्ट्र मंत्री स्वर्गीय सुषमा स्वराज यांच्या विनंतीवरून कुलभूषण जाधव प्रकरणात त्यांनी केवळ एक रुपया शुल्क आकारले होते. तसेच देशातील उद्योगपती, व्होडाफोन, रिलायन्स, मुकेश अंबानी, रतन टाटा या सर्व दिग्गज मंडळींच्या कायदेशीर खटल्यांचेही साळवे यांनी प्रतिनिधित्व केले आहे. बेळगाव सीमा प्रश्नी महाराष्ट्र सरकारची बाजू मांडणारे देखील ते मुख्य वकील म्हणून काम पाहतात