दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि आनंददायी चैतन्यमय वातावरणात नवरात्र उत्सवात होणारी श्री दुर्गामाता दौड यावर्षी साध्या पद्धतीने काढण्याचा निर्णय श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
दरवर्षी बेळगाव येथे मोठ्या उत्साहात श्री दुर्गामाता दौड काढण्यात येते. मात्र यावर्षी ही दौड साध्या पद्धतीने काढण्याबरोबरच अतिरिक्त खर्च टाळून तो निधी रायगड येथे बसविण्यात येणाऱ्या सुवर्ण सिंहासनासाठी द्यावा, असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांनी केले आहे.
बेळगाव शहर उपनगर आणि ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात दौड काढण्यात येते. मात्र यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे आणि सरकारने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करून दौड काढण्यात येणार आहे. समाजाच्या हिताच्या दृष्टीने ही दौड साधे पद्धतीने काढण्यात येणार आहे.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान ही संघटना देश आणि धर्म यांच्या हितासाठी आज पर्यंत कार्यरत आहे. याचबरोबर यापुढेही ती कार्यरत राहणार आहे. या दौंडमध्ये “कोरोना भगावो देश बचावो” अशा घोषणा देऊन उत्साह द्विगुणित करण्यात येणार आहे. मात्र सरकारने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे ही दौड निघणार आहे. याची कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही या बैठकीत करण्यात आले.
ताशिलदार गल्ली कलमेश्वर मंदिरात ही बैठक झाली. बैठकीला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील, अजित पाटील, विभाग प्रमुख पुंडलिक चव्हाण, तालुकाप्रमुख परशराम कोकितकर, तालुका कार्यवाहक कल्लाप्पा पाटील, अनंत चौगुले, प्रमोद चौगुले, अंकुश केसरकर, मदन मुचंडी, विनायक कोकितकर, नामदेव पिसे, किरण बडवानाचे, महेश गावडे, महेश जांभळे, हिरामणी मुचंडी, शेखर पाटील, वैभव कदम, प्रसाद धामणेकर, महेश पाटील, श्रीधर शहापूरकर, निहाल जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.