बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारीसाठी इच्छूक कोणीही काँग्रेस पक्षाकडे अर्ज करू शकतात, असे आवाहन केपीसीसी अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी केले आहे.
शहरातील शासकीय विश्रामधाममध्ये आज शनिवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी उपरोक्त आवाहन केले. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवार कोण असेल याची मला कल्पना नाही असे सांगून ते पुढे म्हणाले की, सध्या प्रथम पक्षसंघटना मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. व्यक्ती निष्ठा आणि विचारांच्या अगोदर पक्षसंघटना आहे हे सर्वांनी ध्यानात घ्यावे.
राज्यातील शिरा व आर. आर. नगर या मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांबद्दल देखील अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यासाठी स्थानिक पातळीवर समित्या स्थापण्यात आलेल्या आहेत. रामलिंग रेड्डी यांच्या नेतृत्वाखालीही एक समिती स्थापण्यात आली आहे.
त्यांच्याशी चर्चा करून समितीच्या नांवाची शिफारस करेल त्यावर विचार करून या दोन विधानसभा मतदार संघातील काँग्रेस उमेदवाराबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे शिवकुमार यांनी सांगितले.
आर. आर. नगर मतदारसंघात डिडिके रवी यांच्या पत्नीला तिकीट देण्याचा काँग्रेस विचार करत आहे. याखेरीज कांही वरिष्ठ नेतेदेखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. परिणामी कोणाला तिकीट द्यावयाचे याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.