बेळगावच्या टिळकवाडी पहिल्या रेल्वेगेटपासून ते आरपीडी क्रॉस, देशमुख रोडची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून या रस्त्यावरून वाहनधारकांना कसरत करून वाहतूक करावी लागत आहे. बेळगावच्या प्रमुख रस्त्यांपैकी असलेल्या या रस्त्याच्या अवस्थेवर पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने या भागातील नागरिकांची नाराजी व्यक्त होत आहे.
बेळगाव स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत आहे. परंतु बेळगावमधील अनेक रस्त्यांची अवस्था अशीच आहे. टिळकवडीचा मार्ग हा बेळगावमधील प्रमुख रस्त्यांपैकी एक आहे.
टिळकवाडी पहिले रेल्वे गेट ते आरपीडी क्रॉसपर्यंत आणि देशमुख रोड वर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून वाहनधारकांना या मार्गावरून जाताना कसरत करावी लागत आहे.
शिवाय अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. रात्रीच्यावेळी या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.
यासंदर्भात महानगर पालिका अधिकारी, स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांना अनेकवेळा निवेदन देण्यात आले आहे. परंतु पालिका प्रशासन आणि स्मार्ट सिटी अधिकारी याबाबात मौन पळत आहेत. बेळगावच्या जनतेच्या सहनशीलतेची प्रशासनाने परीक्षा पाहू नये, या रस्त्याची डागडुजी त्वरित करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.