Wednesday, November 20, 2024

/

आमदारांनी केली कोरोना उपचाराबाबत ‘ही’ मागणी

 belgaum

मार्च महिन्यापासून धुमाकूळ घातलेल्या कोरोनाने प्रत्येकाच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केले. एकप्रकारची दहशत निर्माण केलेल्या कोरोनाचा धसका प्रत्येकाने घेतला. यादरम्यान जनजागृतीसाठी आशा -अंगणवाडी कार्यकर्त्या, अनेक कोरोना वॉरियर्स यांच्यासह लोकप्रतिनिधीही रस्त्यावर उतरले. जनजागृतीसाठी कार्य करत असताना अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला. यादरम्यान अनेक शासकीय अधिकारी कोरोनाच्या विळख्यात सापडले. कोरोना संसर्गाच्या विळख्यात सापडलेल्या अधिकाऱ्यांनी यावर इलाज करून घेतले. या उपचारासाठी आलेल्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी म्हणजेच री-इम्बर्समेंटसाठी लोकप्रतिनिधींनी सरकारकडे मागणी केली आहे.

कोरोना हा रोग सांसर्गिक असल्यामुळे याचा फटका अनेक लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांनाही बसला. लोकप्रतिनिधींसह त्यांच्या नातेवाईकांच्या उपचारासाठी आलेल्या खर्चाची प्रतिपूर्ती सरकारने करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान कोरोनावरील उपचारासाठी सरकारच्या खजिन्यावर आधीच भार पडला असून आता लोकप्रतिनिधींच्या उपचाराच्या रकमेची प्रतिपूर्ती करण्याचा ताणही सरकारी तिजोरीवरच बसणार आहे. या उपचाराची रक्कम लाखांच्या घरात आहे. त्यामुळे येत्या कालावधीत कोरोनासोबतच कोरोनाबाधित लोकप्रतिनिधींच्या आणि त्यांच्या नातलगांच्या उपचाराचा खर्च सरकारला झेलावा लागणार आहे.

बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके सुरुवातीच्या काळात जनजागृतीसाठी रस्त्यावर उतरले. यादरम्यान बेळगावमधील हे एकच लोकप्रतिनिधी असे होते, ज्यांनी तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम केले. आमदार अनिल बेनके यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या उपचाराचा खर्च सुमारे ८.५५ लाख इतका असून या उपचारातील १.९२ लाख रुपये आमदारांच्या तब्येतीवर तर उर्वरित रक्कम ही त्यांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांवर खर्च करण्यात आली आहे.

रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे यांनीही कोरोना संसर्गावर उपचार घेतले आहेत. त्यांच्या उपचाराचा खर्च जवळपास ३ लाखांचा आहे. यामधील १.५ लाख रुपये त्यांच्यावरील उपचारासाठी खर्च झाले आहेत तर उर्वरित १.५ लाख रुपये त्यांच्या पत्नीवरील उपचारासाठी खर्चण्यात आले आहेत.

भद्रावतीचे आमदार बी. के. संगमेश्वर यांनी ५.११ लाख रुपयांचे बिल जमा केले असून. त्यामधील ३ लाख रुपये त्यांच्यावर तर उर्वरित रक्कम त्यांच्या पत्नीवरील उपचारासाठी खर्च झाली आहे.

गुरमितकलचे आमदार नंदनगौडा कंदकुर यांनी ५.५२ लाख रुपयांच्या खर्च बिल जमा केले असून, त्यांच्यावरील उपचारासाठी ३.२९ लाख रुपये खर्च झाले आहेत तर २.२२ लाख रुपये त्यांच्या पत्नीवरील उपचारासाठी खर्च झाले आहेत.

त्याचप्रमाणे कोप्पलचे आमदार राघवेंद्र हितनाळ यांनी प्रतिपूर्तीसाठी २.३६ लाख रुपयांची बिले सादर केली असून १.३६ लाख हे स्वतःवर आणि उर्वरित १ लाखाची रक्कम त्यांच्या मुलांवरील उपचारासाठी खर्चण्यात आली असल्याचे रीइम्बर्समेंट अर्जात नमूद करण्यात आले आहे.

अनेक लोकप्रतिनिधींनी केलेला प्रतिपूर्तीचा अर्ज आणि दुसऱ्या बाजूला सामान्य कोविड रुग्णांची होत असलेली दशा. कोरोना रुग्णांवर उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी तर दुसऱ्या बाजूला पैशांअभावी उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी. त्याचप्रमाणे एकाबाजूला शासकीय रुग्णालयात सुविधांअभावी होत असलेली रुग्णांची परवड तर दुसऱ्या बाजूला खाजगी रुग्णालयात लाखोंचा खर्च करण्यासाठी करण्यात येत असलेली रुग्णालयाची मागणी! या साऱ्यांमध्ये मोठी तफावत असून सरकार सर्वसामान्यांच्या गरजांकडे लक्ष देते कि लोकप्रतिनिधींच्या उपचारासाठी खर्च करण्यात आलेली रक्कम अदा करते? नेमक्या कोणत्या गोष्टीला सरकार प्राधान्य देईल? हे पाहणे येत्या काळात निर्णायक ठरणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.