मातृत्वासोबत कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी समाजातील नवदुर्गा ‘बेळगाव लाईव्ह’ च्या माध्यमातून प्रकाशझोतात आणत आहोत. नवदुर्गा.. ज्यांनी स्त्री-पुरुष या भेदापलीकडे जाऊन पुरुषाच्या बरोबरीने अनेक क्षेत्रात पुढाकार घेतला आहे.. अशा नवदुर्गांची कहाणी आपण पाहणार आहोत.. आज नवरात्रीची तिसरी माळ.. यानिमित्ताने बेळगावसह अनेक ठिकाणी सापांना जीवदान देऊन सापाबद्दल जनजागृती करणाऱ्या निर्झरा आनंद चिट्ठी यांच्याशी केलेली बातचीत…
‘साप’ म्हटलबरोबर आपण सावध होतो. मनाची घाबरगुंडी उडते. गाव काय, शहर काय, साप दिसला की त्याला आपण काठीने ठेचतो. ही एक बाजू. तर दुसऱ्या बाजूला हिंदू धर्मात सापाला देवतासमान पुजले जाते. परंतु त्याच्याच दुसऱ्या बाजूला घरात शिरलेल्या किंवा कुठेही दिसलेल्या सापाला ठेचताना तो साप विषारी आहे की बिनविषारी? याचा आपण कधीच विचार करत नाही. घाबरगुंडी उडालेल्या अवस्थेत आपण काहीवेळा हकनाक सापाचा बळी घेतो. त्यातच महिलावर्गाला तर सापाची वेगळीच भीती! किंचाळून, गोंधळून घाबरणाऱ्या महिलाही अनेक आहेत. परंतु बेळगाव मध्ये अशा सापांसोबत अलगदपणे वावरणाऱ्या म्हणजेच सर्पमित्र निर्झरा चिठ्ठी!
चंदगड तालुक्यातील हाजगोळी येथील निर्झरा चिठ्ठी यांचा विवाह येळ्ळूर येथील सर्पमित्र आनंद चिट्ठी यांच्याशी झाला. विवाहाआधी सर्वसामान्य महिलांप्रमाणेच सापांविषयी प्रचंड भीती असणाऱ्या निर्झरा चिट्ठी यांनी आपल्या पतीसमवेत सापविषयीची भीती हळू हळू मनातून काढून टाकली. सापांविषयी अभ्यास करून आपल्यासोबतच समाजात साप या विषयावर जनजागृती सुरु केली. सापांविषयीची शास्त्रीय माहिती त्यांनी मिळविली. आणि त्यानंतर त्यांचा सापांसोबतचा प्रवास सुरु झाला.
आजपर्यंत निर्झरा चिठ्ठी यांनी १८९० सापांना जीवदान दिले आहे. रात्री – अपरात्री बिनधास्तपणे सापाला पकडण्यासाठी त्या विविध ठिकाणी जातात. याशिवाय साप पकडण्यापासून ते सापाला सुरक्षित स्थळी नेऊन सोडण्यापर्यंत एवढेच नाही तर काही वेळा लोकांच्या मनातील भीतीमुळे अनेक साप जखमी होतात. अशा जखमी सापांवर उपचार देखील करताना त्या कचरत नाहीत. २०१५ साली एकाच दिवशी त्यांनी तब्बल १३ साप पकडले आहेत. अनेकठिकाणी सापांविषयी जागृती करण्यासाठी त्यांनी व्याख्याने दिली आहेत. हे काम करताना अनेकवेळा त्यांना सर्पदंशही झाला आहे. परंतु आजतागायत त्यांनी हाती घेतलेले हे कार्य अर्धवट सोडले नाही. घरकाम सांभाळून पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभं रहात त्यांनी अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातूनही काम केले आहे.
प्रत्येकाचा वेगवेगळा असा छंद असतो. परंतु सातत्याने सापाच्या विषयी डोक्यात चक्र चालणाऱ्या निर्झरा चिट्ठी यांना ‘सापासह बाईक रायडींग’ ची हौस आहे. हौसेला मोल नाही असं म्हणतात. त्यांची ही हौस त्यांनी पूर्ण केली आणि त्यांच्या या उपक्रमाला यूट्यूबच्या माध्यमातून जगभर प्रसिद्धी मिळाली. देशातील महिला सर्पमित्र म्हणून निर्झरा चिठ्ठी यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. यासोबतच त्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणि फॅशन जगतातही अनेक ऑफर्स आल्या आहेत. बेळगांव मधील उत्सव सखी आयोजित फेम फिएस्टामध्ये त्यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय ग्राम पंचायत सदस्या म्हणून 5 वर्षे त्या कार्यरत होत्या.9
भारतात ठिकठिकाणी नागोबाची मंदिरे आहेत. परंतु सापांविषयी म्हणावी तितकी जागरूकता नागरिकांमध्ये दिसून येत नाही. विशेषतः महिलांमध्ये सापांविषयी जागरूकता नाही. सापाविषयीचे अज्ञान, अंधश्रद्धा दूर करून, साप आणि मानवातील गैर समजुतीची दरी दूर करून भयमुक्त भारताचे स्वप्न त्या बाळगतात. उंदराना खाऊन शेतातील धान्याचे रक्षण करणारा सापसुद्धा हकनाक मारला जातो. या सापांना मारल्यामुळे नकळत आपले नुकसान होत आहे. शेतीला उपद्रव ठरणार्या आणि अनेक रोगांना कारणीभूत ठरलेल्या उंदरांची संख्या आपल्या अविचारामुळे वाढत आहे. सापांविषयी अचूक आणि योग्य माहिती नागरिकांपर्यंत पोहिचविण्याचा त्यांचा मानस असून समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे हे ध्येय असल्याचे त्या सांगतात. वनविभाग, पर्यावरण प्रेमी, सर्प संशोधक व सरकार, यांची मदत झाल्यास 90 टक्के सर्प दंशामुळे होणारे मृत्यू कमी करता येतील, आणि अज्ञानामुळे जात असलेला सापांचा जीवही वाचेल, अशी आशा त्यांना आहे.
सापांचा आणि लोकांचा जीव वाचण्याचे कार्य स्वतःचा जीव धोक्यात घालून निर्झरा चिट्ठी करत आहेत. त्यांच्या या कार्याला ‘बेळगाव लाईव्ह’ चा सलाम. आणि त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा !
-वसुधा कानूरकर सांबरेकर