सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर पंधरा दिवसांचा कालावधीही उलटला नाही तोच राजकीय वर्तुळात उमेदवारीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. अद्याप लोकसभा पोटनिवडणुकाही जाहीर झाल्या नसून भाजप आणि काँग्रेस मध्ये उमेदवार निवडीच्या राजकारणाचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. भाजपाच्या वतीने सुरेश अंगडी यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी जाहीर होणार कि इतर कुणाला जाहीर होणार यासह काँग्रेसमध्येही इच्छूकांच्या भाऊगर्दीत उमेदवारीसाठी अनेक दिग्गज मान्यवरांची नांवे पुढे येऊ लागली आहेत.
काँग्रेसमध्ये प्रामुख्याने ‘पॉवरफुल’ उमेदवार म्हणून माजी मंत्री, माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांचे नाव प्रामुख्याने घेतले जात आहे. प्रकाश हुक्केरी हे बेळगाव जिल्हा पालकमंत्रीपदी असताना बेळगावचा विकास गतिमान होता. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांमध्ये प्रकाश हुक्केरी यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी प्रकाश हुक्केरी हे योग्य असल्याची चर्चा रंगत आहे.
याशिवाय अशोक पट्टण, महांतेश कौजलगी यांचीही नांवे पुढे येत असून दुसऱ्या बाजूला बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, त्यांचे भाऊ चन्नराज हट्टीहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर यांचा मुलगा मृणाल हेब्बाळकर यांनाही उमेदवारी घोषित होण्याची शक्यता राजकीय सूत्रांकडून वर्तविली जात आहे. काँग्रेसमध्ये अनेक इच्छुक उमेदवारांची यादी पुढे येत असून यादरम्यान जेडीएस आणि काँग्रेसची हातमिळवणी होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. उमेदवार निवडीचा चेंडू सध्या काँग्रेसच्या हायकमांड कडे असून याबाबत काँग्रेस राज्याध्यक्ष डी. के. शिवकुमार कोणता निर्णय घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.