Thursday, November 28, 2024

/

अंगडींच्या निधनानंतर काँग्रेसची नवी रणनीती?

 belgaum

दिवंगत खासदार, रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर अवघ्या काही दिवसातच बेळगावच्या राजकीय वर्तुळातील हालचाली गतिमान झाल्या आहेत. भाजपच्या वतीने अंगडी कुटुंबियातील एका सदस्याला उमेदवारी जाहीर करण्याबरोबरच आता काँग्रेसच्यावतीने अंगडी कुटुंबियातील सदस्याला उमेदवारी जाहीर होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

बेळगावमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी एकमेकांवर झाडल्या जात आहेत. सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर लोकसभा पोटनिवडणुकीचे आराखडे युद्धदपातळीवर तयार केले जात आहेत. यातच सुरेश अंगडी हे पक्षनिष्ठ असल्यामुळे आणि सलग ४ वेळा खासदारपदी निवडून येऊन बेळगावच्या विकासात सातत्याने अग्रभागी असल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला उमेदवारी देण्यात येण्याची मागणी करण्यात येत होती. अंगडी यांच्या निधनानंतर त्यांची मोठी मुलगी किंवा त्यांच्या सुविद्य पत्नीला ही उमेदवारी जाहीर करावी अशी आग्रही मागणी काही भाजप नेत्यांनी केली आहे. जर अंगडी यांच्या कुटुंबियांना उमेदवारी दिली नाही तर ती आपल्याला मिळावी यासाठीही अनेक भाजप नेते पुढारले आहेत. परंतु घराणेशाहीला दुजोरा न देणाऱ्या भाजप पक्षाच्या नेत्यांनी हा निर्णयाचा चेंडू हायकमांडच्या कोर्टात टाकला. यादरम्यान काँग्रेसने रणनीती आखण्यास सुरुवात केली असून अंगडी कुटुंबियांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून मिळाली आहे.

शुक्रवारी काँग्रेस राज्याध्यक्ष डी. के. शिवकुमार सुरेश अंगडी यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यानंतर सांबरा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना पुन्हा त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. डी. के. शिवकुमार यांनी उमेदवारीच्या राजकारणाला आणि या सर्व घटनाक्रमाला आणखी फाटे फोडले असून अंगडी कुटुंबियांना उमेदवारीच्या नावावर सुरु असलेल्या राजकारणाला भाजप केवळ हवा देण्याचे काम करत आहे. बेळगाव विमानतळाच्या विकासासाठी सुरेश अंगडी यांनी जोरदार प्रयत्न केले असून त्यांचा मृतदेह भाजपाला बेळगावमध्ये आणता आला नाही, ही गोष्ट भाजपासाठी लाजिरवाणी आहे. बंगळूरमध्ये असलेले केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांच्या निधनानंतर भाजपने त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली नाही आणि आताही अंगडी यांच्या कुटुंबियांना उमेदवारी भाजप देऊ शकणार नाही, परंतु काँग्रेस अंगडी यांच्या कुटुंबियांना उमेदवारी देऊ शकते का असा विचार डी. के. शिवकुमार चालवत असतील का?याबाबत देखील चर्चा रंगू लागल्या आहेत.

येणाऱ्या काळात लोकसभा निवडणुकीत विजयी उमेदवारांपेक्षाही कोणता पक्ष कोणाला उमेदवारी जाहीर करेल, याची आतुरता राजकीय वर्तुळात जितकी आहे तितकीच सामान्य कार्यकर्ते आणि जनतेत आहे. त्यामुळे सुरेश अंगडी यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळेल का? आणि उमेदवारी जाहीर झाली तर कोणत्या पक्षाच्यावतीने जाहीर होईल? भाजप व्यतिरिक्त इतर पक्षाची उमेदवारी अंगडी कुटुंब स्वीकारेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळात मिळणार आहेत. तोपर्यंत राजकीय नेत्यांची आरोप – प्रत्यारोपांची मालिका ही सर्वसामान्य जनतेसाठी मनोरंजनात्मक ठरणार आहे, हे नक्की.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.