भकास शहराची झलक ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत होणाऱ्या कामातून दिसून येत आहे. प्रत्येक ठिकाणी होत असणाऱ्या स्मार्ट सिटी योजनेच्या अंतर्गत कामातील त्रुटी दिवसेंदिवस पुढे येत असून तक्रारींचा ओघही वाढत आहे. यासंदर्भात स्मार्ट सिटीचे शशिधर कुरेर यांच्याशी अनेक संघटना, नागरिकांनी संपर्क साधून या समस्या सोडविण्यासाठी निवेदने दिली आहेत.
शहरातील अनेक ठिकाणी स्मार्ट बसस्थानके उभी करण्यात आली आहेत. परंतु या बसस्थानकाच्या उदघाटनापूर्वीच अनेक तक्रारी पुढे आल्या. काही ठिकाणच्या बसस्थानकाची कामे अपूर्णावस्थेतच आहेत. तर अनेक बसस्थानकांसमोर माती, सिमेंट आणि विटांचे ढिगारे तसेच भूमीअंतर्गत घालण्यात आलेल्या केबल्स जशाच्या तशा पडून आहेत. दोन दिवस शहर परिसरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. यादरम्यान स्मार्ट सिटीमधील चन्नम्मा सर्कल जवळील रेक्सटॉकीज समोर असलेल्या बसस्थानकाची झालेली अवस्था पहायला मिळत आहे. हे बसथांबे उभे करून अजून एक वर्षाचाही कालावधी उलटला नाही. परंतु या बसस्थानाकचे काम निकृष्ठ असल्याचे समोर आले आहे. कालच्या पावसामुळे या बसस्थानकाच्या छतातून पाणी गळत आहे. याचा व्हिडीओ एका जागरूक नागरिकाने पाठविला आहे.
कोट्यवधींचा निधी वापरून ही स्मार्ट सिटी योजनेतील कामे करण्यात आली आहेत. परंतु निकृष्ठ दर्जा, तांत्रिक रित्या चुकीच्या पद्धतीने होत असलेली कामे ही जनतेसाठी धोकादायक ठरत आहेत.
शिवाय कोट्यवधींच्या निधीचा चुराडा करण्यात येत असल्याचेही निदर्शनास येत आहे. स्मार्ट सिटीसाठी काम करणाऱ्या अनेक कंत्राटदारांच्या बाबतीतही तक्रारी पुढे येत असून या कामांच्या दर्जाची पडताळणी स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी करणे अनिवार्य आहे.