कोरोना आणि कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी योग्य प्रभावी उपाययोजना करा, अशी सूचना मुख्यमंत्री बी एस. येडियुरप्पा यांनी जिल्हाधिकार्यांना दिली.
बेळगांव जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी आज बुधवारी शासकीय विश्रामधाम येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी उपरोक्त सूचना केली. प्रत्येकाने मास्क वापरणे आवश्यक आहे आणि जर त्या नियमाचे उल्लंघन करत असेल तर दंडात्मक कारवाई करा अशी सूचना त्यांनी केली. सामाजिक अंतर पाळणे अत्यंत आवश्यक आहे. असेही त्यांनी सांगितले. कोवीड -19 चाचण्यांसंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांकडून सर्व माहिती घेतली आणि पुढील काळात केंद्र सरकारकडून येणाऱ्या मार्गसूचीचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबद्दल माहिती देताना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी गेल्या कांही दिवसात कोरोना बाधितांची संख्या कमी होत असून मृत्यू दरही कमी आला आहे. तसेच सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यावर आपण भर देऊ असेही स्पष्ट केले.
याप्रसंगी गृहमंत्री बसवराज बोम्मई, व पालकमंत्री रमेश जारकीहोळी उपस्थित होते. त्याचप्रमाणे बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. डी., जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंमबरगी, अप्पर जिल्हाधिकारी अशोक धुळगुंडे, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. तुक्कार, बीम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप, बेळगावचे उपविभागीय अधिकारी अशोक तेली यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.