काँग्रेस पक्ष हा कमिशन एजंटांचा पक्ष असल्याची टीका करत आज बेळगावमध्ये आलेल्या केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेसवर टीका करत जोरदार निशाणा साधला आहे. आज बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी काँग्रेसविरोधात अनेक वक्तव्ये केली आहेत.
केंद्र सरकारच्यावतीने जरी करण्यात आलेल्या कृषी विधेयकाला विरोध करून काँग्रेस शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. गरिबांचे शोषण करणाऱ्या कमिशन एजंटाप्रमाणे काँग्रेस पक्ष काम करतो असा आरोप त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी एपीएमसी कायदा अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असून शेतकऱ्यांना मुक्तपणे व्यापार करण्यासाठी या कायद्याची तरतूद करण्यात आली आहे.
परंतु काँग्रेस प्रत्येक छोट्या गोष्टीत राजकारण करतो असेच राजकारण शेतकऱ्यांच्या बाबतीत करत असून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात येत असल्याची टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांना व्यापार करणे सोयीचे ठरावे यासाठी काँग्रेसने आधी शेतकऱ्यांसाठी अशाच घोषणा केल्या होत्या परंतु केवळ आश्वासने देऊन आधी एक आणि नंतर एक वक्तव्य काँग्रेस नेहमीच करत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
निवडणुकांना आधारभूत ठेऊन काँग्रेस पक्ष नेहमीच अनेक आश्वासनांचा पाऊस पाडतो. परंतु एकही आश्वासन पूर्ण करत नाही. एपीएमसी कायद्याला त्वरित काँग्रेसने विरोध दर्शविला. हा कायदा शेतकऱ्यांच्या हिताच्यादृष्टीने अंमलात आणण्याचा विचार केंद्र सरकार करत असून या कायद्यामुळे शेतकऱ्यांना मुक्तपणे व्यापार करणे सहज शक्य होणार आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. परंतु राजकारण पुढे करून शेतकऱ्यांची आणि जनतेची दिशाभूल करून कमिशन एजंटप्रमाणे वागणाऱ्या काँग्रेसने या कायद्याच्या बाबतीतही राजकारण केले असल्याचा आरोप प्रल्हाद जोशी यांनी केला.
आज बेळगावमध्ये आलेले केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, सरकारचे मुख्य सदस्य महांतेश कवटगीमठ, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, आमदार अभय पाटील, अनिल बेनके यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.