कॅम्प परिसरामध्ये वावरणाऱ्या युवक-युवतींना सध्या पोलिसांच्या गस्ती पथकाचा त्रास सहन करावा लागत असून या पथकातील एक महिला कॉन्स्टेबल धाक दाखवून पैसे उकळत असल्याचे समजते.
याबाबतची अधिक माहिती अशी की, कॅम्प येथील क्लब रोड ते सीपीएड दरम्यानच्या रस्त्यावर विमा कंपनीत कामावर जाणारी एक विवाहित महिला आपल्या परिचयातील एका युवकाशी बोलत उभी होती. हे उभयता आपापली दुचाकी वाहने घेऊन उभी असताना त्या ठिकाणाहून जाणाऱ्या पोलीस गस्ती पथकातील महिला कॉन्स्टेबलने त्या महिलेला हटकले. तसेच इथे उभा राहून काय करत आहात? अशी विचारणा करून तुम्हाला आमच्या सोबत पोलीस स्टेशनला यावे लागेल, असा पोलिसी धाक दाखविला. तेंव्हा संबंधित महिला आणि त्या युवकाने आम्ही फक्त बोलत उभे आहोत असे सांगून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. तथापि त्यांचे एकही ऐकून न घेता एकतर पोलीस स्टेशनला चला नाहीतर दंड भरा असे सांगून या महिला कॉन्स्टेबलने यांच्याकडे पैशाची मागणी केली. तसेच त्यांच्याकडून तब्बल 1 हजार रुपये वसूल करून त्याची पावतीही न देता ही महिला कॉन्स्टेबल गस्ती समवेत निघून गेल्याचे सांगण्यात आले.
संबंधित महिला कॉन्स्टेबलकडून यापूर्वीदेखील या पद्धतीने युवक-युवतींना लुबाडण्याचे प्रकार घडले असल्याचे समजते. हा वाटमारीचाच प्रकार असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया युवक-युवतीकडून व्यक्त होत आहेत. तरी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे.