जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तीन अट्टल दुचाकी वाहन चोरांना अटक केली असून त्यांच्याकडून १३ मोटारसायकल जप्त केल्या आहेत.
शनिवार दिनांक २४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास हुक्केरीचे सीपीआय गुरुराज कल्याणशेट्टी यांनी एका दुचाकी वाहनचालकाला नंबर प्लेट नसल्यामुळे अडवले होते. या दरम्यान या वाहनचालकाला वाहनाच्या कागदपत्रांबद्दल विचारणा करण्यात आली असता त्याच्याकडून समर्पक उत्तरे मिळाली नाहीत.
संशयास्पद गोष्ट वाटत असल्यामुळे कल्याणशेट्टी यांनी हुक्केरी पोलीस स्थानकात चोरीला गेलेल्या वाहनांच्या तक्रारींची यादी मागविली. हुक्केरी पोलीस स्थानकाचे पीएसआय शिवानंद गुडगेनट्टी यांनी तपासणी करताच हे वाहन एलीमुन्नोळी येथून चोरीला गेल्याची तक्रार आल्याचे सांगितले.
हे वाहन चोरीचे असल्याचे लक्षात येताच अधिक चौकशी करून दाऊद खुदासाब सरकवास (रा. जमखंडी) आणि महेश बसप्पा मगदूम (रा. कल्लोळ) या दोन आरोपींना अटक करण्यात आली. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी , वरिष्ठ पोलीस आयुक्त अमरनाथ रेड्डी, आणि गोकाक उपविभागाचे डीएसपी मनोजकुमार नाईक यांनी यासंबंधी लक्ष पुरवून जी. आय. कल्याणशेट्टी, शिवानंद गुडगेनट्टी, रमेश पाटील, बी. डी. नेर्ली, आर. आर. गिड्डाप्पगोल, विठ्ठल नाईक, अजित चिकोडी, महेश करगुप्पी, एल वाय. कलारगी, मैलार बेंनी, मंजुनाथ नादी, अजित नाईक, मुसा अत्तार या पथकाने अधिक तपासाकडे लक्ष दिले. या दरम्यान चौकशीअंती वाहनचोरीच्या प्रकारात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली.
शिवानंद महादेव चौगुला (रा. गांधी नगर, हुक्केरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या तिन्ही आरोपींनि चौकशीअंती आपण विविध भागातून १३ मोटारसायकल चोरी केल्याचे कबुल केले असून विविध कंपन्यांच्या या सर्व मोटारसायकल पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
या सर्व मोटारसायकलींची किंमत जवळपास ६२४००० रुपये आहे, अशी माहिती पोलीस विभागाने जाहीर केलेल्या माहितीपत्रकात देण्यात आली आहे.