बेळगांव स्मार्ट होत असतानाच महापालिकेने आता रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांनाही स्मार्ट बनवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील रस्त्यावर भाजी विक्रेत्यांना आता अधिकृत करण्याबरोबरच महापालिकेकडून त्यांना तशी ओळखपत्रे देण्यात आली आहेत. त्यामुळे आता नोकरदार लोकांच्या गळ्यात ज्याप्रमाणे ओळखपत्रे लटकताना दिसतात तशी ओळखपत्रे भाजी विक्रेत्यांच्याही गळ्यात पहावयास मिळणार आहेत.
बेळगाव शहरातील रूपांतर स्मार्ट सिटी करण्यासाठी सध्या अनेक विकास कामे व उपक्रम राबविली जात आहेत. शहरातील रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्यांसाठी देखील महापालिकेने नवा उपक्रम सुरू केला आहे. यापूर्वी रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्यांना महापालिकेकडून ठराविक कालावधीसाठीचे परवाना पत्र दिले जात होते. हे परवाने घरी ठेवून भाजीविक्रेते भाजी विकण्यासाठी जात होते. त्यामुळे एखादा वादग्रस्त प्रसंग उद्भवल्यास भाजी विक्रेत्यांना आपला परवाना तात्काळ सादर करणे अशक्य होत होते. मात्र या पद्धतीत यावेळी सुधारणा करण्यात आली असून आता नवे परवानापत्र देताना तसेच परवाना पत्राच्या नुतनीकरणासह शहरातील भाजी विक्रेत्यांना गळ्यात घालायची ओळखपत्रे देखील देण्यात आली आहेत.
महापालिकेतील भाजी विक्रेत्यांच्या कमिटीच्या सदस्य संगीता खोत यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्या शहरातील जवळपास 40 स्त्री-पुरुष भाजी विक्रेत्यांना महापालिकेची अधिकृत ओळखपत्रे देण्यात आली आहेत.
ही ओळखपत्रे 3 वर्षासाठी वैध असणार असून त्यानंतर संबंधित भाजी विक्रेत्यांना आपल्या ओळखपत्राचे नूतनीकरण करून घ्यावे लागणार आहे. महापालिकेकडून लवकरच रस्त्यावर भाजीपाला व फळे यांची विक्री करणाऱ्या बरोबरच पावभाजी गाडीवाले, भेळपुरी गाडीवाले, आईस्क्रीम गाडीवाले, आमलेट पाव -चिकन गाडीवाले आदींकडून टॅक्स वसुली केली जाणार आहे. महापालिकेकडून कालच यासंदर्भात निविदा काढण्यात आल्या आहेत.
या टॅक्स वसुलीप्रसंगी भाजी विक्रेत्यांकडील ही ओळखपत्रे सहाय्यभूत ठरणार आहेत. याखेरीज स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरातील रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्या भाजी विक्रेत्यांसाठी दुकान गाळे बांधून देण्यात येणार आहेत. ही योजना ज्यावेळी राबविण्यात येईल, त्यावेळी ओळखपत्र असलेल्या परवानाधारक भाजी विक्रेत्यांना प्राधान्याने दुकान गाळे मिळणार आहेत, अशी माहिती देखील संगीता खोत यांनी दिली.