सीमाभागातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अनेक दिवसांपासून गटबाजीला सुरुवात झाली असून शिरोळकर आणि मजूकर असे दोन गट पडले आहेत. यातील प्रत्येक गटाकडून पदासाठी हेवेदावे करण्यात येत असून आज शिरोळकर गटाच्या वतीने याच पदाच्या मुद्द्यावरून पत्रकार परिषद आयोजित केली होती.
या पत्रकार परिषदेत हणमंत मजूकर आणि यांच्या गटातील पदाधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आले आहेत. सीमाभागातील शिवसेनेत मागील २० ते २२ वर्षांपासून जिल्हाप्रमुखपदी प्रकाश शिरोळकर यांची पक्षाच्यावतीने निवड करण्यात आली असून उपजिल्हाध्यक्षपदी बंडू केरवाडकर, तालुका प्रमुखपदी सचिन गोरले, शहरप्रमुखपदी दिलीप बैलुरकर, शहर उपप्रमुख प्रवीण तेजम, राजकुमार बोकडे, राजू तुडयेकर, प्रकाश राऊत, तालुका उपप्रमुख पिराजी शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. शिवाय त्यांच्या पदाची त्यांना रीतसर कार्डही पक्षाच्यावतीने देण्यात आली आहेत. सीमाभाग संपर्क प्रमुख म्हणून अरविंद नागनुरी हे सातत्याने सीमाभागातील शिवसेनेसाठी झटत आहेत. याउलट हणमंत मजूकर हे स्वयंघोषित पद घेऊन सर्वत्र वावरत आहेत. यासोबत त्यांच्यासह असलेले अनेक लोक हे स्वयंघोषित पद भूषवित असून गटबाजी करत आहेत. सीमाभागात अनेक ठिकाणी शिवसेना नेते म्हणवून घेण्यात धन्यता मनात आहेत.
सीमाभागात अजूनही युवा सेनेची स्थापना झाली नसून युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी स्वतःच्या मुलाचे नाव लावून वेगळेच राजकारण करण्यात येत आहे. बेळगावमध्ये अनेक युवक शिवसेनेच्या तत्वानुसार कार्य करीत आहेत. परंतु याला अनेकवेळा हणमंत मजूकर यांनी विरोध दर्शविला आहे. प्रसारमाध्यमांना चुकीची माहिती दिली आहे. अनेक युवक स्वतःहून पुढाकार घेऊन करत असलेल्या कार्याला सुरुवातीला विरोध दर्शवून सत्ता हातात घेण्यासाठी स्वतःच्याच मुलाचे नाव युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी लावण्याचे राजकारण करण्यात येत आहे. शिवसेना ही कोणा एकाची मक्तेदारी नसून या पक्षासाठी झटणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. त्यामुळे हणमंत मजूकरांनी सीमाभागातील जनतेच्या आणि शिवसैनिकांच्या भावनेशी खेळ करू नये, असा इशारा आज पत्रकार परिषदेत देण्यात आला.
या पत्रकार परिषदेत प्रकाश शिरोळकर, बंडू केरवाडकर, सचिन गोरले, दिलीप बैलुरकर, प्रवीण तेजम, राजकुमार बोकडे, राजू तुडयेकर, प्रकाश राऊत, पिराजी शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.